गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
Pune Crime, Love Marriage Attack : कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर त्याच्या पत्नीच्या भावांनी पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपळे निलख परिसरात घडली. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने झटापटीदरम्यान हल्लेखोराच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याने तरुण थोडक्यात बचावला, तरीही या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल वीर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल यांच्यासह अनिकेत वीर आणि दीपक वीर हे दोघेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. सध्या या तिघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रोहन लांडगे आणि संदीप लांडगे या दोन भावांना ताब्यात घेतले आहे.
अमोल वीर आणि लांडगे कुटुंबीय हे पूर्वीपासून एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी अमोल यांनी लांडगे यांच्या बहिणीसोबत कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा प्रचंड राग रोहन आणि संदीप यांच्या मनात होता.
पिस्तूल खाली पडल्याने टळला मोठा अनर्थ
मंगळवारी दुपारी १ वाजता अमोल वीर हे पिंपळे निलख परिसरात असताना, रोहन आणि संदीप यांनी त्यांना गाठले. पूर्ववैमनस्यातून त्यांनी अमोल यांच्यावर पिस्तूल आणि कोयत्याच्या साहाय्याने थेट हल्ला चढवला. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल उगारण्यात आले होते, मात्र झालेल्या झटापटीत पिस्तूल हल्लेखोराच्या हातातून जमिनीवर निसटून पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात अमोल यांच्यासह त्यांना वाचवण्यासाठी आलेले अनिकेत आणि दीपक हे दोघेही गंभीर जखमी झाले.
सांगवी पोलिसांकडून दोघांना बेड्या
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना (रोहन आणि संदीप लांडगे) ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील पिस्तूल आणि कोयता जप्त केला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या हल्ल्यामागील अधिक परिस्थिती आणि हेतूचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.