टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार
दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पसार
पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली
संजय गडदे, मुंबई
अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. काल संध्याकाळी ७ च्या सुमारास जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला. घटनेनंतर तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. सुरुवातीला जुहू परिसरातून पसार झाल्यानंतर आरोपी अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचे सांगितले जात आहे. अंधेरी स्थानक परिसरात दुचाकी सोडून त्यांनी रेल्वेने पळ काढल्याची साम टीव्हीच्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलीस विविध शक्यता तपासत आहेत.
या तपासात पोलिसांच्या हाती लागलेली दुचाकी महत्त्वाचा दुवा ठरू शकते. सध्या ही गाडी अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. तपासादरम्यान या दुचाकीची यापूर्वी तीन वेळा खरेदी-विक्री झाल्याची माहिती पुढे आली आहे. जोगेश्वरी परिसरातील धीरज नावाच्या व्यक्तीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ही गाडी विकल्याचे समजते. मात्र, दुचाकीची मालकी नव्या खरेदीदाराच्या नावावर झाली नव्हती. त्यामुळे ही गाडी नेमकी कोणी खरेदी केली, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि गोळीबाराच्या कटात तिचा वापर कोणी केला, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे.
दुचाकीच्या व्यवहारांची माहिती, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी किंवा छोटा भाऊ म्हणवणाऱ्या अनिल पंडितचे नावही या प्रकरणाशी जोडले जात आहे. अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, बाबा सिद्दिकी यांची हत्या, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता टायगर श्रॉफच्या गाडीवरील हल्ला, या घटनांमुळे मुंबईतील चित्रपटसृष्टीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.