
200 आठवडे सातत्याने आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अभ्यास करुन त्यांना आपलेसे वाटतील असे मालिकेचे विषय, घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र आणि सोबतीला जाणकार अशी लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची फौज हेच स्टार प्रवाहचं खऱ्या अर्थाने वेगळेपण. मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्राची पहिली पसंती स्टार प्रवाह वाहिनीला आहे. हेच प्रेम द्विगुणीत करण्याच्या हेतूने स्टार प्रवाह सादर करीत आहे नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात.
प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अश्याच एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.
या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, आमच्या वयाच्या नटांची नेहमी एक खंत असते की आता आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. मात्र तरीही आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये न अडकता आपल्यासाठीही मध्यवर्ती भूमिका लिहिली जावी. टीव्ही माध्यमाची मी आभारी आहे की आम्हाला मध्यवर्ती घेऊन भूमिका लिहिल्या जात आहेत. या मालिकेतलं सुधा हे पात्र मला खूपच भावलं. ‘माझ्यासोबत आता तू देखिल संसारातून रिटायर हो’ हे नवऱ्याचं म्हणणं तिला पटतं मात्र तिचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. घर-संसारात तिचा जीव अडकला आहे. प्रत्येक गृहिणीला आपलसं वाटेल असं हे पात्र आहे अशी भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली.
अभिनेते मंगेश कदम म्हणाले, मालिकेचा विषय आपल्या खूप जवळचा आहे. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. यशवंतचं देखिल असंच एक स्वप्न आहे. कोकणातल्या घरी आपल्या पत्नीसोबत निवांत आयुष्य जगायचं असं त्याने मनाशी ठरवलेलं आहे. यशवंतप्रमाणे जवळपास प्रत्येकाचच हे स्वप्न असतं. मात्र आई-बाबा आपल्या जबाबदारीमधून कधीही रिटायर होत नाहीत. नात्यांची उत्तम गुंफण असणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन येतोय याचा खूप आनंद आहे असं मंगेश कदम म्हणाले.
स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, 'आई आणि वडील हे आपले दैवत असतात आणि ही मालिका त्यांना आणि त्यांच्या निःस्वार्थपणाला अर्पण आहे. जे बोट धरून आपण चालतो, जी पावलं आपल्याला बळ देतात ती सुद्धा कधीतरी थकतील, त्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीतून कधी तरी मुक्तता मिळायला हवी. त्यांना सुद्धा जाणीव करून देणं फार महत्वाचं असतं की आता आराम करा. मुलं, सुना, जावई, नातवंडं अशी अनेक नाती उलगडत जाणारी गोष्ट आणि आई-वडील त्यांची भूमिका कशी शेवटपर्यंत ठामपणे आणि प्रामाणिकपणे बजावतात हे अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही मालिका सर्वांच्या घरात आणि मनात स्थान मिळवेल यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.