Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित 'समर्थ' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. आधुनिक जीवन, कौटुंबिक नाती आणि अध्यात्माचा संगम दाखवणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
Samarth Movie
Samarth MovieSaam tv
Published On

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक काळाच्या संदर्भात नव्याने मांडणाऱ्या 'समर्थ' या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली असून, अध्यात्म, कुटुंब आणि जीवनमूल्यांचा प्रभावी संगम पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माकडे वळणारे वडील आणि आधुनिक विचारसरणीमुळे त्यांच्या निर्णयांना विरोध करणारा मुलगा यांच्यातील भावनिक संघर्ष यात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. दोन पिढ्यांमधील मतभेद, बदलती जीवनशैली आणि नात्यांमधील दुरावा यांचे वास्तववादी चित्रण टीझरमध्ये पाहायला मिळते.

Samarth Movie
Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

चित्रपटात समर्थ रामदास स्वामींचे विचार केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून, ते आजच्या धकाधकीच्या जीवनातही माणसाला योग्य दिशा देणारे असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विचारांमुळे कुटुंबातील नातेसंबंध कसे बदलतात, वडील आणि मुलामधील दुरावा कमी होतो का आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते का, याची उत्तरे चित्रपटातून मिळणार आहेत.

Samarth Movie
Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी सांगितले की, 'समर्थ'हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला आपलीशी वाटेल." निर्माते रविंद्र पाठक यांनीही चित्रपटाबद्दलचा विश्वास व्यक्त करत सांगितले की, 'समर्थ' हा चित्रपट दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्यांचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख करेल."

चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक जीवनाशी सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com