(सचिन गाड, साम टीव्ही मुंबई)
Salman Khan Galaxy Apt Firing: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. ऐश्वर्या रॉयला केलेली कथित मारहाण, हिट अँड रन आणि काळवीट हत्या प्रकरणामुळे सल्लू मिया नेहमीच वादात राहिलाय. मात्र आता सलमानच्याच जिवाला धोका निर्माण झालाय. वांद्र्यातल्या त्याच्या घरावर दोन अज्ञात आरोपींनी गोळीबार केलाय. या व्हिडिओत दिसणारे दोन हल्लेखोर दिसत आहेत. पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी सलमानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टममेंटवर गोळीबार केला. रस्त्यावरून त्यांनी थेट निशाणा साधला तो गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दुस-या मजल्यावर हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. (Latest News)
यातली एक गोळी गॅलरीतून आत घुसली तर तीन गोळ्या भिंतीला लागल्या. सुदैवानं पहाटेची वेळ असल्यानं कुणालाही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी सलमान खान घरातच होता. या हल्ल्यानंतर पोलिसांसह सर्वच तपासयंत्रणा कामाला लागलीय. फॉरेन्सिक टीम, मुंबई पोलीस आणि खंडणी विरोधी पथकानं सर्व बाजुंनी तपास सुरू केलाय.
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी एका रिक्षाचालकाकडे पत्ता विचारल्याची माहितीही समोर येतीय. त्यानंतर आरोपी दहिसरच्या दिशेनं पसार झाले. भाईजानच्या घरावरील हल्ल्यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त होतोय. कारण काळवीट शिकार प्रकरणानंतर बिश्नोई गँगकडून सातत्यानं सलमानला धमक्या दिल्या जात होत्या.
नेमकं प्रकरण आहे काय?
1998 साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. यावेळी सलमान खाननं दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याला आरोप आहे.लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. त्यामुळे बिश्नोई समाजाचा सलमानवर प्रचंड राग आहे.
याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे महाराष्ट्र ATSनेही या हल्ल्याची गांभीर्यानं दखल घेतलीय. गोळीबारामागे कुणाचा हात आहे, याचा तपास ATSकडूनही केला जातोय.
बिश्नोई गँगच्या निशाण्यावर भाईजान
लॉरेन्स बिश्नोई आणि वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रारनं अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. बिश्नोई आणि गोल्डी ब्रारनं अनेकदा मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी त्यांचे शूटर्स पाठवले होते. लॉरेन्सचा अत्यंत खास गँगस्टर संपत नेहरा हा 2018 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करण्यासाठी आला होता. मात्र हरयाणा पोलिसांनी नेहराला अटक केली होती.
यानंतर सलमानच्या सुरक्षेत सातत्यानं वाढ करण्यात आली. मात्र तरीही त्याच्या घरावर गोळीबार होणं ही निश्चितच चिंतेंची बाब आहे. मोठ्या पडद्यावर हिरोची भूमिका साकारणारा सलमान खान सामाजिक जिवनात कायम वादाच्या भोव-यात राहिलाय. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराला जुन्या वादाचीच किनार आहे. आता हा गोळीबार बिश्नोई गँगनं केलाय की आणखी कुणी? याचा शोध घेऊन आरोपींना पकडणं हे मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.