'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'वरून नवा वाद! रूपाली चाकणकर आक्रमक, ३ दिवसांपासून सेन्सॉर बोर्डात फेऱ्या

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. रूपाली चाकणकर यांनी सेन्सॉर बोर्डात हस्तक्षेप केल्याचा आरोप दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी केला आहे.
Maharashtra Epstein Files
Maharashtra Epstein FilesSaam Tv
Published On: 

Maharashtra Epstein Files: पुण्यात सध्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी सेन्सॉर बोर्डात हस्तक्षेप केल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी केला आहे. रूपाली चाकणकर सलग तीन दिवस सेन्सॉर बोर्डात गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून दबाव?

दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महाराष्ट्र इपस्टीन फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रूपाली चाकणकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी सेन्सॉर बोर्डात तीन दिवस भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

साडी आणि मंगळसूत्रावर कोणाचा पेटंट नाही!

या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांना दाखवण्यात आलेल्या लूकवरूनही चर्चा सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना स्वरूप सावंत म्हणाले की, साडी आणि मंगळसूत्र यावर कोणाचाही पेटंट असू शकत नाही. सामान्य महिला ज्या पद्धतीने साडी आणि मंगळसूत्र घालतात, त्याच पद्धतीने चित्रपटात दीपाली सय्यद यांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या गोष्टींवर आक्षेप घेण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चित्रपट काल्पनिक असल्याचा दिग्दर्शकांचा दावा

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नसल्याचे स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले. चित्रपटातील पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चित्रपटाला विरोध करण्यामागचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, स्वरूप सावंत यांचे स्पष्टीकरण

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वरूप सावंत म्हणाले की, ते संस्थेमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतात. मात्र, प्रोडक्शन टीम जे सांगेल त्यानुसार त्यांना काम करावे लागते. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे 'महाराष्ट्र इपस्टीन फाइल्स' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र कधी मिळणार आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.