Rohit Shetty House Firing Update: बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणात गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली आसाराम फसाळे उर्फ बाबू याला अटक करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने ही कारवाई केली असून, आरोपीला आज उशिरा मुंबईच्या एस्प्लेनेड (फोर्ट) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे १२.४५ वाजता अज्ञात संशयितांनी रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर हवेत पाच राउंड गोळीबार केला होता. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सुरक्षा वाढवली आणि तपास सुरू केला. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारत सोशल मीडियावरून रोहित शेट्टी यांना धमकी दिली होती.
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांनी गोळीबारात वापरलेली स्कूटर पुण्यात शोधून काढली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यक्तीकडून आरोपी आदित्य गायकी याने ३० हजार रुपयांना ही स्कूटर खरेदी केली होती. त्यावेळी त्याने कोऱ्या कागदावर सहीही घेतल्याचे समोर आले आहे.
आरोपी आदित्य गायकी आणि समर्थ पोमाजी यांनी ही स्कूटर मुंबईतील जुहू परिसरात पूर्वनियोजित ठिकाणी सोडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व आरोपींना शुभम लोणकर याच्याकडून थेट सूचना मिळत होत्या. गुन्हा करण्यासाठी आरोपींनी Signal ॲपचा वापर केला असून, गुन्हा झाल्यानंतर हे ॲप डिलिट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
सरकारी वकील आणि पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होते आणि त्याच्याच सांगण्यावरून संपूर्ण कट रचण्यात आला. शुभम लोणकरचा माग काढण्यासाठी आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या घरातून एक पिस्तूल, तीन मॅगझिन आणि एक एअर गन जप्त केली आहे. विशेष म्हणजे, शुभम लोणकर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातीलही मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.