Tiger Shroff Firing: मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफवरील फायरिंगची घटना अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. या घटनेची मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फायरिंग करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल आणि कायद्याच्या चौकटीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टायगर श्रॉफ यांच्याशी तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशीही संवाद साधला. दोघांनाही चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
मुंबईने नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर गँगवॉरचा काळ अनुभवला आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी गँगवॉरचा बंदोबस्त करून कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणली. आता पुन्हा कोणी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याच पद्धतीने कठोरपणे रोखले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
मुंबई सुरक्षित ठेवणे आणि मुंबईकरांच्या मनातील सुरक्षिततेची भावना कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. गँग कोणतीही असो, व्यक्ती कोणतीही असो; दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकार आणि मुंबई पोलीस सोडणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबतही आवश्यक ती काळजी घेतली जाईल. मात्र सुरक्षा ही केवळ प्रसिद्ध व्यक्तींपुरती मर्यादित नसून मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे धमकी, दहशत किंवा दादागिरीच्या माध्यमातून कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पोलिसांकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.