Badshah: रॅपर बादशाहची पत्नी आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी हिने सोशल मीडियावर केलेल्या एका भावनिक पोस्टमुळे त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. पतीसोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान ईशाने प्रथमच मौन सोडत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. पतीच्या सत्ता, प्रभाव आणि दडपणामुळे आपण अनेक वर्षे गप्प राहिल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ईशाने लिहिले, "काही लढाया अशा जखमा देऊन जातात ज्या बाहेरून दिसत नाहीत. मी बराच काळ गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती. माझ्या पतीचा प्रभाव, सत्ता आणि इतर गोष्टींमुळे मी दडपणाखाली होते आणि गप्प राहणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय आहे, अशी मी स्वतःची समजूत घातली होती."
ईशा रिखीने सोडले मौन
ईशा पुढे म्हणाली, "मौन बाळगणे म्हणजे परिस्थिती स्वीकारणे नव्हे; तो केवळ तग धरून राहण्याचा एक मार्ग होता. आज मी भीतीऐवजी धिटपणे सर्वांच्या समोर येत आहे. कदाचित मी अजून संपूर्ण प्रकार सांगण्यास तयार नसेन, पण सर्व काही ठीक असल्याचा आव आणणे थांबवण्यास मी नक्कीच तयार आहे."
ईशाच्या या पोस्टनंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी ३ विजेती सना मकबूल हिने "तू खंबीर आहेस" अशी कमेंट केली. अभिनेत्री प्रियाल गोरने "तुझ्यावर प्रेम आहे" असे लिहिले, तर चेतना पांडेने "कधीही घाबरू नकोस" असा सल्ला दिला. अभिनेत्री जस्मिन भसीनसह इतर अनेक कलाकारांनीही ईशाला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिच्या आयुष्यातील काही खास क्षण दाखवत "प्रत्येक वादळ एक धडा असतो, प्रत्येक प्रार्थना एक आशा असते" असे कॅप्शन दिले होते. त्यानंतर बादशाह आणि ईशा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना वेग आला होता.
बादशाहचे यापूर्वी जस्मिन मसीहसोबत लग्न झाले होते. २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना जेसेमी ग्रेस मसीह सिंग नावाची मुलगी आहे. त्यानंतर ईशा रिखीसोबत त्याने 24 मार्च २०२६ रोजी साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या ४ महिन्यांनंतरच ईशाने केलेल्या ताज्या खुलाशामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.