Aadi Anant Movie: नाती काही नशिबाने मिळतात, तर काही नाती आपण आयुष्यभर जपून कमावतो. प्रेम, आपलेपणा, सहवास आणि भावनांनी जोडलेल्या नात्यांची हसत-खेळत, धमाल शैलीत गोष्ट सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. जेजुरी येथे श्री खंडोबाचे आशीर्वाद घेत या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पाहायला मिळते. एका व्यक्तीच्या कुशीत दुसरी व्यक्ती विसावलेली दिसत असून, हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधार अधोरेखित करते. त्यामुळे या दोघांमधील नाते नेमके काय आहे आणि चित्रपटाची कथा कोणत्या भावविश्वाभोवती फिरते, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे.
अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी पहिल्यांदाच अशा खास अंदाजात पाहायला मिळणार असल्याने चित्रपटात भावनिक क्षणांसोबतच धमाल आणि विनोदाची मेजवानीही असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दोघांसोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसं एकमेकांच्या जवळ असूनही त्यांच्यातील भावनिक अंतर वाढत असल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत आपल्या माणसांचा सहवास, प्रेम आणि भावनिक आधार किती महत्त्वाचा आहे, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफण्यात आल्याचे पोस्टरवरून जाणवते. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या रूपात दिसणाऱ्या नात्यांची ऊब, त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि माणसांमधील भावनिक बंध हा चित्रपटाचा केंद्रबिंदू असणार आहे.
दिग्दर्शक महेश लिमये यांनी चित्रपटाच्या भावविश्वाबद्दल सांगितले की, नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही व्यक्त होत असते. मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांमध्ये नात्यांची खरी किंमत जाणवते. याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न ‘आदि अनंत’मधून करण्यात आला आहे. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी स्वतःला जोडावे, हा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. दिग्दर्शन महेश लिमये यांचे असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. ‘आदि अनंत’ हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.