जळगावात 'गुरुसन्मान' सोहळ्यात चिंतामण पाटील यांचा सत्कार
नाट्यवारकरी, कलाकार आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती
प्रा. डॉ. प्रवीण भोळे आणि प्रकाश पारखी यांनी कौतुकाची थाप दिली.
चिंतामण पाटील यांनी शिष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई
जळगावमध्ये खान्देश नाट्य प्रतिष्ठान या संस्थेने ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक चिंतामण पाटील यांच्या पासष्टी निमित्त कृतज्ञता सोहळा आयोजीत केला होता. शहरातील मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे हा कार्यक्रम रंगला. यानिमित्ताने जळगावातील नाट्य क्षेत्रातील नवे-जुने कलावंत एकत्र आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे संचालक प्रा. डॉ. प्रवीण भोळे आणि पुण्यातील नाट्यसंस्कार कला अकादमीचे संचालक प्रकाश पारखी उपस्थित होते.
'चिंतामण पाटील यांचे आजवरचे नाट्यक्षेत्रासाठी असलेले योगदान खऱ्या अर्थाने हौशी रंगभूमीसाठी पथदर्शी आहे. त्यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे आहे. 'नाट्य-चिंतामणी' ने खान्देशचा सांस्कृतिक यज्ञ धगधगता ठेवला', असे गौरवोद्गार प्रा. डॉ. प्रवीण भोळे यांनी काढले. डॉ. भोळे हे मुळचे जळगाव शहराजवळच्या असोदा गावचे आहेत. असोदा गाव हे कवयित्री बहिणीबाईंचं गाव म्हणून सर्वदूर परीचित आहे. पारीख यांनीही अध्यक्षीय भाषणातून चिंतामण पाटील यांच्या नाट्य विषयक कार्याचे कौतुक केले. 'गुरुसन्मान म्हणजे रंगभूमीबद्दलच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. अविरतपणे हौशी रंगकर्मीना घडविण्याचे कार्य चिंतामण पाटील यांनी यापुढेही चालु ठेवावे', अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी 'गुरु सन्मान' नावाने गुरुवर्य चिंतामणराव पाटील अभिष्टचिंतन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी उत्तमराव नेरकर यांच्या 'जाणीव' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. बालरंगभूमी परिषद प्रदेश कार्यवाह योगेश शुक्ल यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिंतामण पाटील आणि त्यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील यांचा शाल, श्रीफळ, ड्रेस, साडी, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह व रोख रुपये 21 हजार देऊन सत्कार करण्यात आला. अत्यंत भावस्पर्शी झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर खान्देश नाट्य प्रतिष्ठानची रंगकर्मी आणि मराठी बिग बाॅस विजेती मेघा धाडे- पावसकर, अभिनेता समीर देशपांडे, अभिनेत्री अनुपमा ताकमोघ, गणेश सोनार, लेखिका सुलभा कुळकर्णी उपस्थित होत्या. 'खानाप्र'चे पदाधिकारी शरद भालेराव यांनी प्रास्ताविक केले. अरुण शिरसाळे यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय रंगकर्मी मंदाकिनी महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सेवानिवृत्त उद्घोषक आणि जेष्ठ रंगकर्मी प्रमोद बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ यांनी मानले.
सत्काराला उत्तर देताना जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांनी माझे शिष्यच माझ्यासाठी सेलिब्रिटी असून हौशी रंगभूमीसाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, 'जळगावचे सर्व नाट्यवारकरी आजवर एक कुटुंब म्हणून तन - मन - धनाने गुण्यागोविंदाने नांदले. आज मला खांद्याला खांदा लावुन संस्था स्थापन करणारे सहकारी कै. किशोर प्रभाकर कुलकर्णी, कै. मेघश्याम हरि महाले यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्याचप्रमाणे मकरंद देशमुख आणि अविनाश चव्हाण या सहकाऱ्यांची साथही मोलाची आहे', असं चिंतामण पाटील म्हणाले. पितृतुल्य कै. डॉ. उल्हास कडूसकर, सदैव आपला आश्वासक हात पाठीवर ठेवून लढण्याची प्रेरणा देणारे कै. शरदचंद्र प्र. धर्माधिकारी, कै. विनायकराव पुराणिक, कै. प्रा. म. मो. केळकर, लेखक नीळकंठ महाजन यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्याशिवाय हा नाट्यप्रवास सहजसाध्य नव्हता, अशी भावना व्यक्त केली.
लेखिका सुलभा कुळकर्णी यांनी खान्देश नाट्य प्रतिष्ठान आणि चिंतामण पाटील यांच्या मुळे रंगभूमीची सेवा करता आली, अशा भावना व्यक्त केल्या. वर्गमित्र प्रा. राजेंद्र देशमुख यांनी नुतन नाट्य मंडळ ते खान्देश नाट्य प्रतिष्ठान मधील आठवणींना उजाळा देत चिंतामण पाटील नाट्य पंढरीचे सच्चे वारकरी असल्याचे सांगितले. अभिनेत्री मेधा धाडे-पावसकर हिने आम्ही बालनाट्य प्रशिक्षणातून घडलो आहे. तेच प्रशिक्षण यापुढेही सरांनी सुरू ठेवावे असे आग्रहपूर्वक सांगितले. तर अभिनेता समीर देशपांडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही सरांनी मोठा शिष्यवर्ग घडवला असे कृतज्ञतापूर्वक सांगितले.
खान्देश नाट्य प्रतिष्ठानची स्थापना 26 जानेवारी 1979 मध्ये झाली. चिंतामण पाटील. मकरंद देशमुख, अविनाश चव्हाण, कै. किशोर कुलकर्णी, कै. मेघश्याम महाले यांनी या संस्थेची स्थापन केली. गेल्या 45 वर्षांतला संस्थेचा प्रवास पाहता जळगावातील नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे.
प्रा. रमेश लोहोटी यांच्या अध्यक्षतेखाली 1984 मध्ये नुतन मराठा महाविद्यालयात नाट्यमंडळाची स्थापना केली. तेव्हा चिंतामण पाटील कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या साडे चार दशकांत चिंतामण पाटलांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून अनेक कलावंताना घडवलं आहे. शिस्त, साधेपणा, कुठलाही बडेजावपणा नसलेल्या चिंतामण पाटील यांना नाट्यवर्तुळात 'मास्तर' म्हणून ओळखलं जातं. वयाच्या पासष्टीतही त्यांचा उत्साह कमी झाला नाही.
या सोहळ्याला कला, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. जेष्ठ रंगकर्मी सर्वश्री रमेश भोळे, दीपक चांदोरकर, अरुण शिरसाळे, होनाजी चव्हाण, महेंद्र सोनवणे, शाहीर परिषदेचे विनोद ढगे, कामगार कल्याण अधिकारी मिलिंद पाटील, भानुदास जोशी, सिनेनिर्माते सुनील झंवर, आकाश बाविस्कर,गौरव लवंगे ,गजानन भट, चंद्रकांत चौधरी, जगदीश नेवे, हनुमान सुरवसे, प्रदीप भोई, अमोल ठाकूर, पवन खंबायत, मंगेश कुलकर्णी, दुष्यन्त जोशी, मोहन रावतोळे यांची विशेष उपस्थिती लाभली.
त्याशिवाय संस्थेचे नवे-जुने कलावंत सर्वश्री मुक्त पत्रकार- दिग्दर्शक संजय निकुंभ, ओमप्रकाश शर्मा, सिनेकलावंत अरुण सानप, सिने अभिनेता सचिन जाधव, सोमनाथ सानप, गुलाब शेख, रविंद्र पाटील, यशवंत विसपुते, प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञीक, वृषाली देशपांडे, संगीता देशपांडे -महाशब्दे, संजीवनी कुलकर्णी-व्यवहारे, प्रसन्न पाध्ये, नाशिक येथून सर्वश्री मंदाकिनी महाजन- भामरे, सुनंदा गवळी -सोनवणे, नरेंद्र शहा, चंद्रकांत अत्रे, मुंबईहून कलावंत रोहित पाटील, अशोक लिमये, तेजश्री पाटील-चौधरी,अविनाश चव्हाण, शाम जगताप ,केतकी भालेराव,अपूर्वा, पुराणिक, सुहास दुसाने, सोनल डहाळे,श्रावणी भालेराव, सरिता तायडे, संदीप सूर्यवंशी, भूषण खैरनार,योगेश कापूरे, धर्मराज देवकर, प्रा. संदीप केदार,नरेंद्र दशपुत्रे,कल्याणी डांगे, दिलीप देसले, मोहन रावतोळे, अरुण साळुंखे, ढोलन चव्हाण, संतोष पाटील, उदय सपकाळे यांची उपस्थिती होती. जळगावसह धुळे, नंदूरबार, नाशिक, यवतमाळ आणि मुंबई, पुणे येथील कलावंत उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.