

छत्तीसगडच्या कबीरधाम भागातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील लालपुर कलामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्दयी हत्या केल्याची घटना न्यायालयाने सिद्ध ठरवत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात विशेष न्यायाधीश गितेश कुमार कौशिक यांच्या न्यायालयाने बुधवारी निर्णय देत आरोपी धनुक राम बर्मन याला हत्या, पुरावे नष्ट करणं आणि वीज चोरी या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं. न्यायालयाने या सर्व आरोपांवर कडक शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनुक राम बर्मन आणि चंद्रकांता बर्मन यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नानंतर आरोपी सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. 20 ऑगस्ट 2024 च्या रात्री या संशयावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर आरोपीने पत्नीला संपवण्याचा कट रचला.
रात्री सुमारे 2 वाजता, चंद्रकांता गाढ झोपेत असताना आरोपीने घरातील विजेच्या तारा तिच्या दोन्ही पायांना लावून तिला करंट दिला. करंट लागल्यानंतर ती तडफडत असतानाही आरोपीने तिच्यावर दया न दाखवता गळा दाबून तिचा जीव घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
आपण केलेल्या हत्येला अपघाताचा रंग देण्यासाठी आरोपीने बिछान्यावर वीज बोर्ड आणि वायर पसरवून ठेवली. जेणेकरून मृत्यू करंट लागून झाला असल्याचं भासवता येईल. याशिवाय मुख्य वायर घरातील पेटीच्या मागे लपवून ठेवण्यात आला होता. सकाळी स्वतःच दरवाजा तोडून आत जाण्याचा बनाव करून त्याने लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पंचनामा करताना तहसीलदार आणि उपस्थित साक्षीदारांना मृत महिलेच्या शरीरावर काळे निशाण दिसले, ज्यामुळे संशय वाढला. त्यानंतर करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टममध्ये करंट लागल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपीने अखेर आपला गुन्हा कबूल केला.
या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत हत्या केल्याप्रकरणी जन्मठेप आणि 2000 रुपयांचा दंड ठोठावला. तसंच कलम 238(क) अंतर्गत पुरावे लपवण्याच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांचा कारावास आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय विद्युत अधिनियमाच्या कलम 135(1)(क) अंतर्गत वीज चोरीसाठी 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1000 रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.