पुण्यातील पर्वती परिसरात एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडलीये. या घटनेमुळे आसपासच्या संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडालीये. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पीडित तरुणीच्या वहिनीने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 35 वर्षीय आरोपी धीरज लोंढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही गतिमंद असल्याची माहिती आरोपीला आधीपासूनच होती. तरीही त्याने तिच्या अवस्थेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलंय.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आरोपीने तरुणीला धमकावून स्वतःच्या घरात नेलं. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या वेळी पीडित तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसंच आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. समाजातील अशा घटकांचे संरक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.