

पुण्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीये. स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचं भासवून एका उच्चशिक्षित तरुणीवर तब्बल २६ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात दोन पुरुष आणि सहा महिला आरोपींना अटक करण्यात आलीये.
५९ वर्षीय राधामोहन मिश्रा असं या भोंदू बाबाचे नाव असून त्याच्यासोबत स्वामी कंवल नयन (वय ५७) यालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही उबाळेनगर खराडी परिसरातील माऊली सदनमध्ये राहत होते. हा प्रकार २००१ ते २०२६ या कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात घडल्याचे तपासात समोर आलंय.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्चशिक्षित असून पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे वडील डॉक्टर आहेत. स्वामी कंवल नयनच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबाचा राधामोहन मिश्राशी परिचय झाला होता. त्यावेळी पंचकुलामध्ये त्याचं ‘गुरुदेव साधना धाम ट्रस्ट’ नावाचं आश्रम होता. मिश्रा साक्षात परमेश्वराचा अवतार आणि दिव्यपुरुष म्हणून कुटुंबासमोर आला होता.
आरोपानुसार, मिश्राने तरुणीला आपलं मूत्र पिण्यास भाग पाडलं, तिला विजेचे शॉक दिले तसंच मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्याने तिला पतीपासून वेगळे होण्यास भाग पाडलं आणि तिची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने तरुणीला त्यांच्या नजरेतही खोटं ठरवलं.
धाडस करून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाघोलीजवळील उबाळेनगर परिसरातील मिश्राच्या आश्रमावर छापा टाकण्यात आला. त्याच्या भुयारी खोलीतून ८ लॅपटॉप, ११ मोबाईल, १९ हार्ड डिस्क, २९ कॅसेट, २३ पेनड्राइव्ह, १० जिवंत काडतुसं तसंच शेकडो वैद्यकीय गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.