अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तुषार देडे असं मृत तरुणाचे नाव आहे. तर समीर वाघे असं आरोपीचं नाव आहे.
बारकू पाडा परिसरात तुषार देडे हा १८ वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्यांच्याशी वाद झाले. या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या १२ तासातच आरोपी समीर वाघेला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने या आरोपीला शोधून काढलं. समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात हत्येच्या ३ घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया वाढवल्या आहेत. याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का? हे पाहावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.