

वाहतूक नियमभंग केला आणि त्याचवेळी वाहतूक पोलिसांनी पकडलं तर, संबंधित वाहनचालकांना दंड आकारला जातो किंवा त्यांच्याकडून वसूल केला जातो. वाहतूक नियम पाळण्याचे वेळोवेळी सरकारकडून आवाहन केले जाते. तरीही काही जण नियम पाळत नाहीत. अनेकदा तर रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात नाहीत, मग वाहतूक नियम मोडला तर काय फरक पडतो असे समजून काही जण जाणूनबुजून सिग्नल तोडणे किंवा नो पार्किंगमधून घुसतात आणि सगळे नियम पायदळी तुडवतात. त्याला प्रतिबंध किंवा आळा घालण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्याद्वारे नियम मोडणाऱ्यांना थेट ई-चालान पाठवले जाते. पण बऱ्याचदा असं होतं की तांत्रिक चुका म्हणा किंवा माणसांकडून झालेल्या चुकांमुळं चुकीच्या माणसाला ई - चालान पाठवलं जातं. ई-चालान आलं म्हणून काही जण संताप व्यक्त करतात, पण जाब कुणाला विचारणार असा प्रश्न त्यांना पडतो. तर काही जण घाबरून जातात आणि नसती कटकट नको म्हणून आकारलेल्या दंडाची रक्कम ऑनलाइन भरून मोकळे होतात. पण चुकून आलेले ई-चालान रद्द होऊ शकते.
तुम्हाला चुकून ई-चालान आलं असेल तर ते रद्द केले जाऊ शकते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागेल. परिवहन मंत्रालयाच्या ई-चालान पोर्टलवर जाऊन तिथं आधी तक्रार नोंदवा आणि प्रत्येक स्टेप फॉलो करा.
सर्वात आधी तुम्ही ई-चालान पोर्टलवर जाऊन संबधित वाहनाचा नंबर आणि चालान क्रमांक नोंदवा.
त्या ठिकाणी पेजवर तुम्हाला ई-चालानची सर्व माहिती मिळेल.
चालान चुकीच्या पद्धतीने आले असेल तर, तक्रार करण्याचा पर्याय निवडा.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल. तो त्या ठिकाणी टाका.
तुम्ही केलेल्या तक्रारीमागचं कारण त्या ठिकाणी नोंदवा किंवा निवडा.
याचाच अर्थ तुम्हाला जे चालान आले आहे, ते चुकीचे आहे, असे सांगा.
तुम्ही ज्या आधारे म्हणता की चालान चुकीचे आहे, त्याचा पुरावा सोबत जोडा म्हणजे अपलोड करा.
त्यात वाहनाचा फोटो, FasTag रेकॉर्ड, पार्किंगचा फोटो यांसारखी माहिती असावी.
त्यानंतर तुम्ही केलेल्या तक्रारीच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सबमिट करा.
एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे, तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक Grievance Ticket Number मिळेल. तो तुम्ही स्वतःकडे सांभाळून ठेवा.
ई-चालान पोर्टलवर तक्रार करूनही तिचे निवारण झाले नाही तर काय कराल? हे प्रकरण व्हर्च्युअल कोर्टात जाऊ शकतं. तिथे तुम्ही चालान क्रमांकाच्या मदतीने हे प्रकरण समोर आणू शकता. त्यानंतर सर्व अत्यावश्यक दस्तावेज आणि पुरावे देऊन चालानवर हरकत नोंदवू शकता.
जर तुम्हाला चुकीचं चालान आलं असेल तर लगेच ते दंड भरू नका.
तु्म्ही दंडाची रक्कम भरली तर, तुमची चूक होती हे मानलं जाईल.
तक्रार करताना तुमच्याकडे पुरावे असावेत.
चालानचा मेसेज आल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवसांच्या आत आपला आक्षेप नोंदवा आणि तक्रार करा.