

अक्षय गुंड, सोलापूर
स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात अनेकजण अर्ध्यावर थांबतात, मात्र अकलूजच्या सायली परांडे यांनी अपयशावर मात करत यशाची नवी उंची गाठली आहे. त्यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पद मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. अकलूजच्या सायली शिवाजी परांडे या अशाच जिद्दींपैकी एक ठरल्या आहेत. सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत सहाय्यक राज्यकर आयुक्त पद पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायली यांचे प्राथमिक शिक्षण अकलूजमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण सांगोल्यात पूर्ण झाले. पुढे त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. याच काळात विविध सेमिनार, गेस्ट लेक्चर्स आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या सहवासामुळे त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला आणि त्यांनी प्रशासन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी रमेश घोलप यांच्या कार्याने त्यांना विशेष प्रेरणा मिळाली.
स्पर्धा परीक्षेचा प्रवास मात्र खडतर होता. 2021 आणि 2022 मध्ये त्यांनी UPSC चे प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही. या अपयशामुळे त्या खचल्या, पण त्यांनी हार मानली नाही. MPSC च्या बदलत्या परीक्षा पद्धतीशी जुळवून घेत त्यांनी नव्याने तयारी सुरू केली. 2023 मध्ये त्यांनी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली, मात्र मुख्य परीक्षा काही गुणांनी हुकली. हा टप्पा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण होता.
2024 मध्ये त्यांनी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत तिन्ही टप्प्यांत यश मिळवले आणि अंतिम यादीत स्थान मिळवले. तयारीदरम्यान आरोग्याच्या समस्याही आल्या, मात्र त्यांनी चिकाटी सोडली नाही.
सायली सांगतात की, परीक्षेचे स्वरूप समजून घेणे, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि नियमित पुनरावलोकन हे यशाचे गमक आहे. त्या विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देतात. त्यांच्या यशोगाथेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.