

सिम कार्ड दुसऱ्याला दिल्यास कारवाई होणार
सिम कार्डच्या गैरवापर केल्यास ३ वर्षांचा तुरूंगवास
दुसऱ्याचे सिम कार्ड वापरल्यास ५० लाखांचा दंड
सायबर फसवणुकीच्या घटनेनंतर दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय
तुमच्या नावावर किंवा कागदपत्रांवर मिळवलेले सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देणे, विकणे किंवा भाड्याने देणे आता महागात पडू शकते. दूरसंचार विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एका सूचनेनुसार, बनावट ओळखपत्रांचा वापर करून सिम कार्डची खरेदी-विक्री करणे किंवा मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकामध्ये फेरफार केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड भरावा लागू शकतो. दूरसंचार विभागाने सोमवारी सिम कार्डचे फसवणुकीने वितरण, दूरसंचार ओळख क्रमांकांचा गैरवापर आणि IMEI क्रमांकांमध्ये फेरफार करण्यांना इशारा दिला.
छत्तीसगडमध्ये एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या घटनेनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दूरसंचार विभाने हा मोठा निर्णय घेतला. छत्तीसगडमधील या प्रकरणामध्ये एका एजंटने लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नकळत २५ बनावट सिम कार्ड सक्रिय केले होते. विभागाने असे सर्व नंबर ब्लॉक केले असून त्या एजंटला काळ्या यादीत टाकले आहे .
सरकारने याबाबत स्पष्टपणे सांगितले की, जर तुमच्या ओळखपत्रावर वापरलेले सिम कार्ड सायबर फसवणुकीसाठी वापरले गेले तर मूळ ग्राहकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा सिम कार्डला 'म्युल सिम' म्हटले जाते. तसंच, कॉलिंग आयडी बदलून किंवा ॲप वापरून बनावट नंबरवरून कॉल करणे हा देखील राष्ट्रीय सुरक्षेविरुद्धचा गंभीर गुन्हा मानला जात आहे.
देशात प्रति व्यक्ती सिमकार्डची संख्या ९ पर्यंत मर्यादित आहे. जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ६ सिमकार्डची मर्यादा आहे. ही मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखण्यासाठी सरकारने डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मवर फोटो दाखवणारे एक नवीन पोर्टल जोडले आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या प्रणाली या पोर्टलशी जोडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दूरसंचार विभागाने सर्व नागरिकांना त्यांच्या ओळखपत्रांवर कोणताही अज्ञात किंवा अनधिकृत मोबाईल क्रमांक सक्रिय नाही याची खात्री करण्यासाठी तात्काळ संचार साथी पोर्टल किंवा ॲपला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.