सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकाकडेच स्मार्ट फोन असतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच मोबाईल असतो. त्यामुळे प्रत्येकाकडेच सिम कार्ड असतं. बऱ्याचदा पालक किंवा कुटुंबातली प्रमुख व्यक्ती तिच्या नावावर सिम कार्ड काढून देते. काहींना व्यवसायासाठीही जास्त सिम कार्ड वापरावे लागत असतील. पण याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता एका पेक्षा जास्त सिम कार्ड कोणालाही वापरता येणार नाहीत. कारण सरकार आणि दूरसंचार विभागाने (DOT) सिमकार्डाबाबत नवा नियम लागू आहे. तसेच एका पेक्षा जास्त सिम कार्ड वापरण्यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
ज्या ग्राहकांच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड नोंदवले गेले असतील त्यांना १० वे सिम कार्ड मिळू शकणार नाहीत. २४ ऑगस्ट पासून हा नियम देशभरात लागू करण्यात येणार आहे. याआधी हा नियम लागू करण्यात आला होता मात्र याचे पालन काटेकोरपणे केले जात नव्हते. या संधीचा गुन्हेगारांना फायदा होत होता. बाजारात अनेक सिम कार्ड सहज उपलब्ध होत असल्याने एका नावावर अनेक सिम कार्ड खरेदी करणं शक्य होतं. चोरांना शोधण्यासाठी पोलिसांना सर्वात प्रथम येणारी ही तांत्रिक अडचण होती. पण दूरसंचार विभागाने लागू केलेल्या या नव्या नियमामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
दूरसंचार विभागाने ९ ऑगस्ट रोजी हे परिपत्रक जारी केले. परिपत्रकानुसार जर एखाद्या व्यक्तिच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्डांची नोंद असेल तर ती सिम कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहेत. हा नियम कोणत्याही एका कंपनीच्या सिमला नाही तर सर्व मोबाईल कंपन्याना लागू करण्यात आला आहे. समजा तुमच्याकडे ३ एअरटेल सिम, ४ जिओ सिम,२ व्हिआयचे असे एकूण ९ सिम असतील तरीही तुम्हाला कोणत्याही कंपनीचे १० वे सिम घेऊ शकत नाहीत.
24 ऑगस्ट पासून नवे सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी अर्जदाराच्या नावावर असलेल्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. सर्व मोबाईल कंपन्यासाठी हा नियम कठोर करण्यात आला आहे. याव्यतिरित्त नवीन सिम खरेदी करताना ग्राहकाला फॉर्ममध्ये याआधी नावावर नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकाची किंवा सिम कार्ड ची संख्या नमूद करावी लागणार आह. मग ती कंपनी कोणतीही असो.
या लागू करण्यात आलेल्या कडक नियमामुळे सायबर फसवणूक, आर्थिक घोटाळे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना वचक बसणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा कोणताही गैरफायदा न घेता योग्य वापर करावा. अशी स्पष्ट सूचना दूरसंचार विभागाने दिली आहे.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे तुम्ही तपासू शकता. सरकारच्या संचार साथी या पोर्टलवर तुमचा मोबाईल नंबर टाकून, तुमच्या नावावर किती नंबर नोंदवले गेले आहेत ते तपासू शकत. एखादा अनोळखी नंबर दिसत असल्यास तक्रार देखील नोंदवू शकता.