

आरबीआयने महाराष्ट्रातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली
पंढरपूर अर्बन बँक आणि मुंबईतील बँकेला दंड
पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी कडक
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुंबईतील एका बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. तर यवतमाळमधील पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढवलेत. आरबीआयने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
यात पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला २ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला. मालमत्ता वर्गीकरण आणि नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPA) संदर्भात नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई केली आहे. दरम्यान आरबीआय नियमांचं उल्लंघन तर कुठे होत नाही ना, याची पाहणी करत असते.
आरबीआयने ३१ मार्च २०२५ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी केली होती. या तपासणीत बँकेनं आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचं दिसून आले. त्यानंतर बँकेला नोटीस बजावण्यात आली. बँकेनं दिलेलं उत्तर आणि झालेल्या सुनावणीत मांडलेली बाजू विचारात घेत आरबीआयकडून ही कारवाई केली गेली. दंड आकारण्यात आलेल्या बँकेने जुनी थकीत कर्ज जी एनपीए झाली आहे, त्यांना आणखी कर्ज दिलं होतं. नियमानुसार आधी थकीत कर्ज फेडलं पाहिजे, मग नवीन कर्ज दिले पाहिजे, असे असतानाही बँकेने कर्ज दिली होती, त्यामुळे कारवाई झाली.
मुंबईतील मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेला सुद्धा आरबीआयने दंड ठोठावला आहे. मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २०,००० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आलाय. नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या भांडवल पर्याप्तता संदर्भातील निर्देशांचे पालन न केल्यामुळे मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले होते. त्याची पुन्हा मुदत वाढवण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत लावलेले हे निर्बंध आता ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहतील. बँकेच्या परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने आणि सार्वजनिक हिताचा विचार करून आरबीआयनं ही कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.