

तुमच्याकडे कार किंवा दुचाकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या १५ डिसेंबरपासून मोटार विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने खासगी कार आणि दुचाकींच्या विम्यासाठी चार विभागांची नवीन रचना निश्चित केली आहे. यामुळे वाहनधारकांना विमा घेताना कोणतं कव्हर हवं आणि त्यासाठी किती प्रिमियम भरायला लागेल, हे स्पष्टपणे समजेल.
नवीन नियमानुसार मोटार विमा चार भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे.
१. थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर: हे कव्हर अनिवार्य असेल. वाहनामुळे तिसऱ्या व्यक्तीला दुखापत, मृत्यू किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यावर त्याची कायदेशीर जबाबदारी या विम्यातून कव्हर केली जाईल.
२. प्रवाशांसाठी लायबिलिटी कव्हर: कारमधले प्रवासी किंवा दुकाचीवरच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत वाहनमालकाची कायदेशीर जबाबदारी या कव्हरमध्ये समाविष्ट असेल. हे कव्हर ऐच्छिक असणार आहे.
३. पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर: वाहनमालकासाठी वैयक्तिक अपघात विमा घेणं अनिवार्य असणार आहे. पण प्रवासी, पिलियन रायडर आणि जास्त वेळ वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी हे कव्हर ऐच्छिक असेल.
४. ओन डॅमेज कव्हर: अपघात, वाहनाचं नुकसान किंवा वाहन चोरीला गेल्यावर या कव्हरचा फायदा मिळतो. हे कव्हर ऐच्छिक असेल.
IRDAI च्या नव्या नियमानुसार विमा कंपन्यांना ग्राहकांना चारही विभागांची माहिती देणारा ऑप्शन फॉर्म आधी द्यावा लागेल. ग्राहकाला आवश्यक असलेल्या कव्हरसमोर टिक करून निवड करता येईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी विमा घेताना हा नियम लागू होणार आहे.
आता विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये प्रत्येक कव्हरसाठी आकारलेले प्रीमियम स्वतंत्रपणे दाखवावं लागेल. तसेच ग्राहकांना कस्टमर इन्फॉर्मेशन शीट (CIS) देणेही बंधनकारक असेल. आधीपासून थर्ड पार्टी विमा असलेल्या वाहनधारकांनाही पॉलिसी सुरू असताना प्रवाशांचे लायबिलिटी कव्हर जास्त प्रीमियम भरून जोडता येणार आहे.
IRDAI चे हे नवीन नियम १५ डिसेंबर २०२६ पासून जारी होणाऱ्या सर्व खासगी कार आणि दुचाकी विमा पॉलिसींना लागू होणार आहेत. बीमा सुगम प्लॅटफॉर्मवरही नवीन रचनेनुसार विमा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.