

is it right time to buy gold after price fall : आखाती देशात युद्ध सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. पण घडले नेमके उलट. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोने तर प्रति तोळा दीड लाखांच्या खाली आले आहे, तर चांदीतही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळली आहे. जळगाव, पुणे, मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील सोन्याच्या दुकानांत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. पण सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का? सोने आणखी स्वस्त होणार का? आणि ही घसरण नेमकी कोणत्या कारणामुळे होत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.. पण त्याआधी सोन्या-चांदीच्या किमतीत नेमकी किती घसरण झाली आहे, ते पाहूया.
सोन्याच्या किमतीत किती घसरण झाली?
खाडी देशात युद्धाला सुरुवात होताच सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ७३ हजारांच्या पार पोहोचला होता. आता किमती आणखी वाढतील, असेच सर्वांना वाटत होते; मात्र त्यानंतर दरात घसरण सुरू झाली. २४ मार्चपर्यंत सोन्याच्या दरात तब्बल १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील दोन दिवसांत सोन्याचे दर प्रति तोळा १३ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचा दर १ लाख ४० हजारांवर आला आहे. म्हणजेच, मागील ३ आठवड्यांत सोन्याची किंमत जवळपास ३३ हजार रुपयांनी कमी झाली आहे. १ मार्च रोजी सोन्याचा दर प्रति ग्रॅम १७,३२३ रुपये इतका होता, जो आज १४,०५० रुपये आहे. तर चांदीचे दर मागील दोन दिवसांत २५ हजारांनी कमी झाले आहेत.
सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार का? नेमके कारण काय?
आखाती देशातील युद्धाला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत, मात्र युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धाचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्यांच्या जगण्यावर झाला आहे. इंधन आणि गॅसची टंचाई निर्माण झाली असतानाच, आता हे युद्ध थांबण्याचे काही संकेत मिळाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा झाली असून काही दिवसांत युद्धाला पूर्णविराम मिळेल, असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्या आहेत. दुसरीकडे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण असले तरी 'ट्रेझरी यील्ड्स' आणि 'डॉलर' कमकुवत झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबणार असल्याचे सांगितले असले, तरी जमिनीवर मात्र तसा परिणाम अद्याप दिसत नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. तसेच, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान भरून काढण्यास वेळ लागणार असल्याने महागाईचा धोका वाढला आहे. या सर्व कारणांमुळे यूएस फेडरल रिझर्व्ह आणि इतर मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोन्यासारख्या उत्पन्न न देणाऱ्या मालमत्तांसाठी (non-yielding assets) हे नकारात्मक संकेत आहेत, त्यामुळे दरात घसरण होत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळीही असेच चित्र दिसले होते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सुरुवातीला सोन्याच्या किमती वाढल्या, पण नंतर त्या दीर्घकाळासाठी घसरल्या.
सोन्याचे भाव कसे आणि का बदलतात?
जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते. जागतिक बाजारपेठ अस्थिर झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत तीव्र चढ-उतार होतात. अनेकदा ही मागणी देशांच्या मध्यवर्ती बँकांकडूनच निर्माण होते. जेव्हा सोन्याची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त वाढते, तेव्हा किमतीत मोठी वाढ होते. जागतिक आर्थिक घडामोडी, महागाईचा दर आणि डॉलरचे मूल्य यावर सोन्याचे दर अवलंबून असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.