

पीएम मोदींनी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केले आहे.
वाढत्या सोने आयातीमुळे रुपया आणि परकीय चलन साठ्यावर दबाव येतोय.
महागाई आणि व्यापार तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात लग्नसोहळ्यात सोने खरेदी करणं एक परंपरा बनली आहे, ते जणू एक समीकरणच आहे. घरात सोनं खरेदी न करता लग्नसोहळा पार पडणं हे क्वचितच घडतं. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना वर्षभर लग्नासाठीसुद्धा सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. हे ऐकून आश्चर्य वाटत असले तरी, यामागील कारण थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे.
पंतप्रधान मोदींचा संदेश साधा आहे, डॉलर वाचवा, भारताच्या परकीय चलन साठ्याचे रक्षण करा. त्यांचे हे आवाहन सध्या सुरू असलेल्या इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढ झाली आहे. युद्धामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. गेल्या काही आठवड्यांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे ७० डॉलरवरून १२६ डॉलरपर्यंत वाढली आहे. यामुळे भारताच्या आयात खर्चात झपाट्याने वाढ होतेय. शिवाय, रुपयावरील दबावही वाढतोय.
पण सोन्याची खरेदी टाळल्याने भारताच्या परकीय चलन स्थितीला नेमकी कशी मदत होते? याचे उत्तर जाणून घेऊ. ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा सुमारे ६९०.६९ अब्ज डॉलर्स आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, जागतिक अनिश्चितता वाढल्याने फेब्रुवारीमध्ये हा साठा ७२८ अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचला होता, परंतु एप्रिलमध्ये तो पुन्हा घसरून सुमारे ६९१ अब्ज डॉलर्सवर आलाय.
त्याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) असा अंदाज वर्तवला की, भारताची चालू खात्यातील तूट (CAD) २०२६ मध्ये ८४.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. ही जीडीपीच्या अंदाजे २ टक्के आहे. वाढत्या चालू खात्यातील तुटीचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे येणाऱ्या डॉलर्सपेक्षा जाणारे डॉलर्स जास्त आहेत. सोनं खरेदी हे त्याचे एक प्रमुख कारण आहे.
भारताने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सुमारे ७२ अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले. ही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २४ टक्क्यांनी जास्त आहे. भारत देश जगातील दुसरा देश आहे, जो सर्वाधिक सोने खरेदी करतो. भारत आपल्या सोन्याच्या गरजेपैकी ९०टक्क्यांपेक्षा जास्त सोनं इतर देशांकडून आयात करतो. भारतात दरवर्षी अंदाजे ८०० टन सोन्याचा वापर होतो.
भारताची सोन्याची आयात २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी मागील वर्षी ५८ अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच सोने आयातमध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशाच्या एकूण आयात बिलात सोन्याचा वाटा हा साधारण ९ टक्के असतो. कच्च्या तेलानंतर हे देशाचे सर्वात मोठे आयात बिल आहे.
आर्थिक वर्ष २०२६ मधील एकूण आयात खर्च: ७७५ अब्ज डॉलर्स
केवळ चार वस्तूंची किंमत: २४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त
कच्चे तेल: १३४.७ अब्ज डॉलर्स
सोने: ७२ अब्ज डॉलर्स
वनस्पती तेल: १९.५ अब्ज डॉलर्स
खते: १४.५ अब्ज डॉलर्स
भारताच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय घट झाली आहे. १ मे रोजी संपलेल्या आठवड्यात, भारताचा परकीय चलन साठा ७.७९४ अब्ज डॉलरने कमी होऊन ६९०.६९३ अब्ज डॉलरवर आला. भारताच्या एकूण आयातीमध्ये या चार वस्तूंचा वाटा ३१.१ टक्के आहे. एकूण आयात बिलामध्ये एकट्या सोन्याचा वाटा जवळपास ९ टक्के आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नागरिकांना या वस्तूंचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी सातत्याने पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याबद्दल बोलत आहेत. ते म्हणाले की, जगभरात इंधनाच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. परकीय चलन वाचवणे हे राष्ट्रीय प्राधान्य बनलंय. यामुळेच मोदींनी सोन्याची खरेदी थांबवावी असं आवाहनही केले.
अर्थशास्त्रज्ञांच्या मते, सोन्याला दैनंदिन गरजेची वस्तू मानले जात नाही. तेलाची दररोज गरज असते, परंतु सोन्याकडे गुंतवणूक आणि बचतीची वस्तू म्हणून पाहिले जातं. त्यामुळे जेव्हा जागतिक संकटाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात, तेव्हा अधिक डॉलर्स देशाबाहेर जात असतात, चालू खात्यातील तूट वाढते आणि रुपया कमकुवत होतो.
जर भारतीयांनी वर्षभर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली तर सोन्याच्या आयातीत ३०-४०टक्के घट झाल्यासही २०-२५ अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. ५० टक्के घट झाल्यास ३६ अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. ही रक्कम अंदाजित चालू खात्यातील तुटीच्या (CAD) जवळपास निम्मी आहे.
वर्षभर सोने न खरेदी केल्याने भारताचा अब्जावधी डॉलर्सचा बहिर्वाह थेट कमी होऊ शकतो. ज्यावेळी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८८ टक्के आयात करतो. अशावेळी हे वाचलेले डॉलर्स महत्त्वाचे ठरतात. त्याऐवजी, अत्यावश्यक ऊर्जा आयातीसाठी पैसे देण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.