Bhuj-Barauni Train Ticket Price : वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर बनवलेली अमृत भारत एक्सप्रेस कमी तिकीट दरात जलद आणि आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. देशात आतापर्यंत शेकडो अमृत भारत एक्सप्रेस धावतात. त्यात आता आणखी एका ट्रेनची भर पडली आहे. पश्चिम आणि पूर्व भारताला जोडण्यासाठी भारतीय रेल्वेने नव्या ट्रेनची घोषणा केली आहे. गुजरातच्या भुज ते बिहारच्या बरौनी दरम्यान नवी 'अमृत भारत एक्सप्रेस' (ट्रेन क्र. १९४२७/१९४२८) सुरू करण्यात येत आहे.
ही ट्रेन तब्बल २,५३२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार अशा चार प्रमुख राज्यांमधील प्रवाशांना या सुपरफास्ट आणि परवडणाऱ्या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. ही ट्रेन २० पेक्षा जास्त स्थानकावर थांबणार आहे. भुज ते बरौनी दरम्यान नवी 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू झाल्यामुळे देशाच्या पश्चिम आणि पूर्व भागांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या चार राज्यांदरम्यान वारंवार प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि व्यापाऱ्यांना या थेट रेल्वे सेवेचा मोठा फायदा मिळू शकतो.
भुज-बरौनी-भुज ही नवी अमृत भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार असून, आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या ट्रेनमध्ये स्लीपर आणि सामान्य (General) श्रेणीचे डब्बे असतील. भुजवरून ही ट्रेन (१९४२७) दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ४:०५ वाजता बरौनीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बरौनीवरून (१९४२८) दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ११:५५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १:१५ वाजता भुजला पोहोचेल.
अहमदाबाद, रतलाम, कोटा, सवाई माधवपूर, गंगापूर शहर, भरतपूर, मथुरा, हाथरस, बरेली, इज्जतनगर, पिलीभीत, लखीमपूर, गोंडा, गोरखपूर, सिवान, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर यांसारख्या २० हून अधिक प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबेल.
अमृत भारत एक्सप्रेस (Amrit Bharat Express) ही परवडणाऱ्या दरात (Affordable Rates) आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी डिझाइन केलेली ट्रेन आहे. या ट्रेनचे तिकीट दर सामान्य सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत फक्त १५% ते २०% जास्त असतात. भुज ते बरौनी यादरम्यान २,५३२ किमीच्या प्रवासासाठी जनरलचे तिकिट ₹४५० ते ₹५५० दरम्यान इतके असू शकतो. तर स्लीपर क्लासचे तिकीट ₹८५0 ते ₹९५० दरम्यान असण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.