

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळतेय. अजितदादांच्या निधानामुळे पक्षात पोकळी निर्माण झाली असून राजकारणातील आपला आधारवड गेल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. दरम्यान अजितदादांनंतर पक्षातील अंतर्गत संघर्ष अनेकदा चव्हाट्यावर आला. यात खासदार सुनिल तटकरे यांचं नाव पुढे राहिलंय. आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या विधानाने पुन्हा एकदा पक्षातील असंतोष बाहेर आलाय.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय पुन्हा एकदा राजकीय पटलावर आलाय. त्याचदरम्यान अजित पवार यांच्या गटातील एका नेत्यानं मोठं विधान केलंय. अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंचं मोठं नुकसान झाल्याचा दावा नेते सलीम सारंग यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सारंग हे आपल्या रोखठोक विधानांमुळे कायम चर्चेत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या एका विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.
अजितदादांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्याचे सर्वाधिक नुकसान झाले या प्रश्नाचे उत्तर देताना सलीम सारंग यांनी थेट तटकरेंचं नाव घेतलंय. सुनील तटकरे आणि अजितदादांची जोडी ही जय आणि वीरूसारखी होती. जय गेल्यानंतर वीरू एकटा पडला,” अशी भावनिक उपमा त्यांनी दिलीय. अजितदादांच्या जाण्याने सुनील तटकरे यांचा मोठा राजकीय आधार गेला असून, त्यांचं हे नुकसान शब्दांत मांडणं कठीण असल्याचंही सारंग म्हणाले.
काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपण कोणत्या पक्षासोबत जाणार नाहीत. आणि जर विलीनीकरण करायचं असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं असं शरद पवार म्हणाले. त्यावरून सुनिल तटकरेंनी प्रतिक्रिया दिली होती.
शरद पवारांनी 6 दशके नेतृत्व करतात. त्यांच्या विधानाचा अर्थ अनेकदा कोणाला कळला नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाचं उत्तर काळाच्या ओघातच मिळेल, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली होती. त्याचवेळी अजितदादांच्या निधनानंतर माझ्यावर वरदहस्त असणारे नेतृत्व उरले नाही, असंही तटकरे म्हणाले होते. हीच रीघ ओढत राष्ट्रवादीच्या सलीम सारंग यांनी तटकरेंबाबत मोठं भाष्य केलंय.
पक्षातील निर्णय असोत, राजकीय संघर्ष असो किंवा कठीण परिस्थिती. अजितदादा आणि सुनील तटकरे यांनी अनेक प्रसंगी खांद्याला खांदा लावून काम केलं. दोघांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, मात्र ही जोडी कायम चर्चेत राहिली. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानंतर तटकरे यांच्या राजकारणातील बदलाकडेही राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. सुनील तटकरे हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक निवडणुका स्वतःच्या राजकीय ताकदीवर लढल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जागांवर पराभव झाला असताना तटकरे यांनी रायगडचा गड कायम राखला, याचाही संदर्भ सलीम सारंग यांनी दिला.
सुनील तटकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेवरही सारंग यांनी भाष्य केलं. “मोठ्या नेत्यांवर लांच्छनास्पद बोलणं आणि बोट दाखवणं अगदी सोपं झालंय. मात्र असं बोलणाऱ्यांनीही एकदा विचार करण्याची गरज आहे. काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत सुनील तटकरे यांनीही आपल्या राजकीय परिस्थितीबाबत भावनिक भाष्य केलं होतं.
“अजितदादांनंतर माझ्यावर वरदहस्त असणारं नेतृत्व उरलं नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं. आपण कोणाच्या राजकारणात अडथळा ठरत असू तर टार्गेट होणारच, मात्र सध्या आपल्या संयमाची आणि राजकीय परिपक्वतेची कसोटी सुरू असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केल्याचं सांगितलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.