अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
अंबरनाथमध्ये एका खाजगी शाळेचा भरधाव व्हॅन मधून दोन चिमुकले रस्त्यावर फेकले गेल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमधून त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात चक्क एका टेम्पोमधून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये ना सुरक्षित आसनव्यवस्था, ना बंद दरवाजे! मुलं अक्षरशः टेम्पोच्या लोखंडी पट्ट्यांना धरून उभी आहेत. जर स्पीड वाढला किंवा टेम्पो एखाद्या स्पीड ब्रेकरवरून उडाला, तर ही निरागस मुलं थेट रस्त्यावर फेकली जातील आणि पुढचा अपघात निश्चित आहे!
धक्कादायक म्हणजे हा टेम्पो चा रस्त्यावरून जात होता त्या रस्त्यावर हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस उभे होते ट्राफिक वार्डन उभे होते मात्र कोणाचीही या टेम्पोकडे नजर गेली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . विद्यार्थ्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील भीषण अपघातानंतरही कल्याण आरटीओ अजूनही गाढ झोपेत का आहे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे .
अंबरनाथच्या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडली, त्यातील एक गंभीर जखमी झाले. ही घटना घडून आठवडाही उलटलेला नाही, तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा, किंबहुना त्याहून अधिक धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात एका खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. त्याचे दरवाजेही नाहीत .चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला, तर ही निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
अंबरनाथच्या घटनेनंतर कल्याण आरटीओने तिथे केवळ काही शाळांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकली. प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई — यापैकी काहीच झाले नाही! आज त्याच आरटीओ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या परिसरातून विद्यार्थी एका टेम्पोमधून अशा जीवघेण्या पद्धतीने नेले जात आहेत "तक्रार करा, मग आम्ही पाहू."अशी उत्तरे आरटीओ कडून दिली जात आहेत .
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? आरटीओ ची निष्क्रियता आणखी किती बळी घेणार आहे? असे प्रश्न आता सर्व सामान्य कडून उपस्थित केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.