एशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला ५ विकेट्सने नमवत ट्रॉफीवर ९ व्यांदा नाव कोरलं आहे. यावेळी भारतीय टीमचा फलंदाज तिलक वर्माला विजयाचा हिरो मानलं जातंय. पाकिस्तानविरुद्ध एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात खेळलेली नाबाद 69 रन्सची झुंजार खेळी आपल्या कारकिर्दीतील “सर्वात खास खेळींपैकी एक” असल्याचं त्याने म्हटलंय.
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तिलकने 53 बॉल्समघ्ये 69 रन्सची खेळी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने 147 रन्सचं लक्ष्य दोन बॉल शिल्लक असताना गाठलं.
सामन्यानंतर झालेल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्विकारताना तिलक म्हणाला, “या सामन्यात खूप दडपण होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. मी शांतपणे, संयम ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात खास खेळींपैकी एक आहे. चक दे इंडिया!”
तिलक पुढे म्हणाला, “आम्ही टीमसाठी कुठल्याही क्रमावर खेळायला तयार असतो. मला माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. विकेट स्लो असेल तेव्हा काय करायचं याबद्दल मी गौतम सरांशी चर्चा केली आहे आणि त्यावर भरपूर सरावही केला आहे.”
विकेटकीपर संजू सॅमसन आणि ऑलराऊंडर शिवम दुबे यांच्या भागीदारीचं त्याने विशेष कौतुक केलं. “संजूची खेळी अप्रतिम होती. तर शिवमने दडपणाच्या क्षणी ज्या शांततेने फलंदाजी केली, ती टीमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली,” असं तिलक म्हणाला. तिलक आणि संजूने चौथ्या विकेटसाठी 57 रन्सची भागीदारी केली. तर शिवमसोबत पाचव्या विकेटसाठी 60 रन्सची भागीदारी केली.
टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) म्हणून अभिषेक शर्माची निवड झाली. तो म्हणाला, “वर्ल्डकप जिंकणाऱ्या या टीममध्ये सलामी फलंदाज म्हणून स्थान मिळवणं सोपं नव्हतं. मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली. कोच आणि कर्णधाराने सुरुवातीपासून मला पाठबळ दिलं. जेव्हा मी चांगलं खेळतो तेव्हा संघाने जिंकणं महत्त्वाचं असतं. काही वेळा अपयश येतं, पण प्रक्रियेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.