शुभमन गिल भारतीय वनडे टीमच्या नेतृत्वाची सूत्रं लवकरच हातात घेणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माच्या जागी गिलला पुढचा वनडे कर्णधार बनवण्याचा निर्णय झाला असून त्याची पहिली टेस्ट ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये असेल. ही मालिका १९ ऑक्टोबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे.
The Indian Express च्या वृत्तानुसार, सध्याचे टीम मॅनेजमेंट २६ वर्षीय गिलला २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी भारताचे नेतृत्व देऊ इच्छितात.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवडीची बैठक झाली. या बैठकीला शुभमन गिलही उपस्थित होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही या निर्णयाच्या प्रक्रियेत सामील करण्यात आल्याची माहिती आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गिलने रोहितच्या निवृत्तीनंतर टेस्ट टीमचं नेतृत्व स्वीकारलं होतं. त्यानंतर आता त्याच्या हाती वनडे नेतृत्वही सोपवण्यात येतं असल्याची चर्चा आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. ३८ वर्षीय रोहितकडून नेतृत्वाची सूत्रं गिलकडे सोपवण्यात येणार हा भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा बदल मानला जातोय.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, जर रोहित आणि विराट २०२७ वर्ल्डकप खेळू इच्छित असतील, तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घ्यावा लागेल. अलीकडेच दोघांनीही भारत ‘ए’ विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘ए’ सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. ही सिरीज ३० सप्टेंबरला कानपूरमध्ये सुरू झाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी टी२० वर्ल्डकप जिंकत दीर्घ काळानंतर आयसीसी किताब जिंकण्याची दुष्काळ संपवला होता. या विजयाच्या लगेचच रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर रोहितने संघाला आठ टीम्सच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अपराजित मोहीम राबवत विजेतेपद मिळवून दिलं.
डिसेंबर २०२१ मध्ये विराट कोहलीने टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने एका व्यक्तीकडे दोन्ही मर्यादित ओव्हर्सच्या फॉरमॅटचे नेतृत्व असावं असा निर्णय घेतला. त्यानुसार, रोहितला वनडे कर्णधार नेमण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वात भारताने २०२३ मध्ये श्रीलंकेत आशिया कप जिंकला आणि त्याच वर्षी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.