आशिया कप २०२५ फायनलपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का
आयसीसीचा हारिस रऊफला दणका
साहिबजादा फरहानला गन सेलिब्रेशनसाठी वॉर्निंग
बीसीसीआयच्या तक्रारीनंतर मॅच रेफरीनं सुनावणी घेतली
आशिया कप २०२५ चे फायनलचे संघ ठरले आहेत. २८ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महाफायनल होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आयसीसीने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबरला सुपर फोरची लढत झाली होती. त्या सामन्यात हारिस रउफ आणि साहिबजादा फरहान यांनी माज दाखवला होता. रऊफनं अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याबद्दल अपशब्द वापरून आक्षेपार्ह इशारे देखील केले होते.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान यानं सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर गन सेलिब्रेशन केलं होतं. आता हारिस रऊफ आणि साहिबजादा फरहान यांच्यावर आयसीसीनं कारवाई केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसीने रऊफवर सामन्याच्या एकूण मानधनापैकी ३० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे. तर साहिबजादा फरहानला गन सेलिब्रेशन केल्यानं तिखट शब्दांत झापलं आहे. त्याला कुठलाही दंड ठोठावला नाही.
मीडियानं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी शुक्रवारी दुपारी पाकिस्तानी संघ ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्या ठिकाणी सुनावणी घेतली. हारिस रऊफ आणि फरहान हे दोघे या सुनावणीला हजर होते. त्यांचे जबाब लेखी स्वरुपातही नोंदवले गेले. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा हे देखील यावेळी उपस्थित होते.
बीसीसीआयने बुधवारी रऊफ आणि फरहान यांच्याविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती. रिपोर्टनुसार, रऊफने भारतीय प्रेक्षकांची खिल्ली उडवतानाच, कोसळणाऱ्या विमानाचे इशारे केले होते. तर फरहान यानं केलेल्या गन सेलिब्रेशनवर आक्षेप नोंदवला होता. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर मॅच रेफरी रिचर्डसन यांनी सुनावणी घेतली. आक्रमक वर्तवणुकीबद्दल रऊफ याला सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला. तर फरहानला वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आले.
सुनावणीवेळी रऊफ आणि फरहान या दोघांनी निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. रऊफ म्हणाला की, ६-० चा केलेला इशारा भारताशी संबंधित नव्हता. तर गन सेलिब्रेशनमागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता, असं फरहान म्हणाला. फरहाननं तर एमएस धोनी आणि विराट कोहलीचंही नाव यामध्ये कोंबलं. त्यांनीही अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं होतं, असा दावा त्यानं केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.