
९ सप्टेंबर रोजी सुरु झालेला आशिया कप आता अंतिम टप्प्यात आहे. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरार रंगणार आहे. एकीकडे, भारत पाकिस्तान सामन्याचा थरार असेल तर दुसरीकडे आशिया कपची प्राइज मनी देखील भुवया उंचावणारी आहे. आशिया कप विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला किती प्राइस मनी मिळणार, जाणून घेऊयात.
आशिया कप २०२५ची प्राइस मनी
मीडिया रिपोर्टनुसार, यंदा आशिया कपच्या प्राइस मनीमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामना जिंकणाऱ्या संघाला २.६ कोटी रुपये प्राइस मनी मिळणार आहे. तर, दुसरीकडे उपविजेत्या संघ देखील मालामाल होईल. उपविजेत्या संघाला १.३ कोटी रुपये प्राइस मनी मिळणार आहे. परंतु, आशियाई क्रिकेट काउंसिलने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. जर असे झाले तर ही रक्कम गेल्या आशिया कपच्या तुलनेत दुप्पट असेल. २०२३ चा आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाला १.२५ कोटी रुपये इतकी प्राइस मनी मिळाली होती. रविवारी, सामना जिंकणाऱ्या संघाला एक चमकदार ट्रॉफी आणि भरघोस बक्षीस रक्कम मिळेल.
प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड
विजेत्या आणि उपविजेत्या संघाव्यतिरिक्त, प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना १२. ५ लाख रुपये मिळणार आहेत. भारताचे स्टार खेळाडू अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव सारखे खेळाडू सध्या या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान आमनेसामने
१९८४ मध्ये आशिया कपची सुरुवात झाली होती. आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने येणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. २०२५ च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. आतापर्यंत, आशिया कपमध्ये भारतीय संघ एकही सामना हारलेला नाही.