इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमधील प्रसिद्ध गोलंदाज स्टीव्ह बारविक यांचं वयाच्या 65व्या वर्षी निधन झालंय. ग्लॅमरगन काउंटी टीमसाठी अनेक वर्षे खेळलेल्या बारविक यांना वेल्सच्या क्रिकेटविश्वातील मोठी व्यक्ती आणि चाहत्यांच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखलं जात होतं. ‘बाझ’ (Baz) या टोपणनावाने ओळखले जाणारे बारविक हे 1980 आणि 1990च्या दशकात ग्लॅमरगन टीमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होते.
स्टीव्ह यांनी त्यांच्या कारकीर्दीत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 456 विकेट्स घेतल्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 325 विकेट्स होत्या. एकूण 488 सामन्यांत त्यांनी तब्बल 781 विकेट्स घेण्याची कामगिरी देखील त्यांच्या नावावर आहे.
स्टीव्ह बारविक यांचा जन्म 6 सप्टेंबर 1960 रोजी नीथमध्ये झाला होता. वेल्सच्या शालेय क्रिकेटमधून आणि त्यानंतर ग्लॅमरगन कोल्ट्सकडून खेळत त्यांनी त्यांची कारकीर्द घडवली. 1981 मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
सुरुवातीला बारविक हे मध्यम वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज होते. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत ‘ऑफ-कटर’ टाकण्यात विशेष प्रावीण्य मिळवलं. बॉलचा वेग आणि त्याची फ्लाइट यामध्ये ते सातत्याने बदल करत असल्याने फलंदाजांना त्यांची गोलंदाजी खेळणं फारच कठीण व्हायचं.
बारविक यांनी 212 फर्स्ट क्लास सामन्यांत 456 विकेट्स घेतल्या. 276 लिस्ट ए सामन्यांत त्यांच्या नावावर 325 विकेट्स आहेत. त्यामुळे दोन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 488 सामन्यांत त्यांनी 781 विकेट्स घेतल्या आहेत.
1993 मध्ये ग्लॅमरगनने जिंकलेल्या संडे लीगच्या विजेतेपदात बारविक यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंटविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज कार्ल हूपर यांची महत्त्वाची विकेट घेतली होती. 1983 मध्ये वॉर्सेस्टरशायरविरुद्ध केलेली गोलंदाजी ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या सामन्यात त्यांनी केवळ 42 रन्स देत तब्बल 8 विकेट्स घेतल्या.
1994 मध्ये समरसेटविरुद्धच्या सामन्यात स्टिव्ह यांनी तब्बल 65.2 ओव्हर्स गोलंदाजी केली. यातील तब्बल 29 ओव्हर्स मेडन होत्या. हा ग्लॅमरगन क्लबचा विक्रम ठरला होता.
1996 मध्ये बारविक यांनी ग्लॅमरगनचा अलविदा केलं. तोपर्यंत त्यांनी टीमसाठी 480 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. त्यांच्या निधनाची माहिती ग्लॅमरगन क्लबने दिली. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी क्लबने त्यांच्या योगदानाचा सन्मान करत त्यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला होता.
ग्लॅमरगनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन चेरी यांनी बारविक यांची आठवण काढताना त्यांना ‘लेजेंडरी कॅरेक्टर’ म्हणजेच क्रिकेटमधील एक खास आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून श्रद्धांजली वाहिली.
स्टिव्ह यांच्या निधनानंतर त्यांच्या माजी सहकाऱ्यांनीही सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलंय. माजी सहकारी रॉबर्ट क्रॉफ्ट यांनी बारविक हे अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटू आणि उत्तम टीममेट असल्याचं म्हटलंय. इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक जॅक रसेल आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक डेव्हिड ‘बंबल’ लॉयड यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.