Harmanpreet Singh saam tv
Sports

Harmanpreet Singh: टीम इंडियाचं मिशन वर्ल्डकप! 51 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय हॉकी संघ सज्ज

Hockey World Cup 2026: हॉकी वर्ल्डकप २०२६च्या मोहिमेला भारत वेल्सविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. ५१ वर्षांची ट्रॉफीची प्रतीक्षा संपवण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंहने बचाव, शिस्त, प्रत्येक सामन्यावर लक्ष आणि पाकिस्तानविरुद्ध भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय पुरुष हॉकी टीम आजपासून एफआयएच हॉकी वर्ल्डकपच्या २०२६च्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारताचा सामना वेल्सशी होणार आहे. तब्बल ५१ वर्षांपासून भारताला वर्ल्डकपच्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार भारतीय टीमने केला असून कर्णधार हरमनप्रीत सिंहनेही यावेळी लक्ष्य स्पष्ट केलंय. जिओस्टारशी बोलताना त्याने प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करणं आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इमोशन्सवर नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलंय.

‘वर्ल्डकप जिंकणं हेच आमचं एकमेव लक्ष्य’

हरमनप्रीतने सांगितलं की, हा वर्ल्डकप टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणि कदाचित त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर आणि प्रशिक्षणावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या मेहनतीच्या जोरावर आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

भारताने टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग पदकं जिंकलीयेत. या यशामुळे संघाला आणखी प्रेरणा मिळाली आहे. यावेळी भारताला तुलनेने अंडरडॉग मानलं जात असलं तरी हीच परिस्थिती देशाला आपली खरी ताकद दाखवून देण्यासाठी योग्य असल्याचे हरमनप्रीतने सांगितले.

वर्ल्डकपची ट्रॉफी मायदेशी आणायची आहे’ हे बोलणं सोपं आहे पण त्यासाठीचा प्रवास कठीण असेल, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र त्यासाठी संघ पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक खेळाडूचा एकमेकांवर विश्वास आहे आणि टीमची मानसिकताही सकारात्मक आहे. कोण गोल करतो किंवा कोण बचाव करतो, यापेक्षा संपूर्ण टीमने मिळून सामना जिंकणं महत्त्वाचं असल्याचं त्याने म्हटलंय.

डिफेंसवर सर्वाधिक भर

वर्ल्डकपमध्ये भारतासाठी बचावाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असं हरमनप्रीतने सांगितलंय. तो म्हणाला की, टीमने बचावावर विशेष सराव केलाय. सामन्यात फुल प्रेस, हाफ कोर्ट किंवा लो प्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीने बचाव करावा लागू शकतो. या प्रत्येक परिस्थितीवर खेळाडूंसोबत स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या आहेत. टीमच्या बैठकीतही याबाबत सविस्तर चर्चा झालीये.

वेल्स, इंग्लंड आणि पाकिस्तानला हलक्यात घेणार नाही

भारताच्या पूल डीमध्ये वेल्स, इंग्लंड आणि पाकिस्तान या टीम आहेत. बहुतांश संघ मॅन-टू-मॅन पद्धतीने खेळतात. पाकिस्तान मात्र झोन आणि मॅन-टू-मॅन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करतो, असं हरमनप्रीतने सांगितलं.

भारताने प्रो लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमधून कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे टीमने ओळखलंय. वेल्सविरुद्धही भारताचा सामना कॉमनवेल्थ गेम्समध्ये झाला आहे. त्यामुळे या संघांच्या खेळाचा व्हिडिओ पाहून त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले जातायत आणि खेळाडूंसोबत त्यावर चर्चा केली जातेय, असंही त्याने सांगितलंय.

वर्ल्डकपचा कोणताही सामना सोपा नसतो. त्यामुळे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही. प्रत्येक सामन्याकडे एकावेळी एक असं पाहायच आणि अनावश्यक विचार करून दबाव वाढवायचा नाही, अशी टीमची भूमिका आहे. वेल्स, त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करून आखलेल्या रणनीतीनुसार खेळणं हेच भारताचे लक्ष्य असेल.

भारत-पाकिस्तान सामन्याकडे नेहमीच विशेष लक्ष असतं. या सामन्यात खेळाडूंनी आपलं मन शांत ठेवणं आणि अति उत्साहित न होणे गरजेचं आहे. या सामन्यात प्रेक्षकांचाही मोठा उत्साह असणार आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याचा सकारात्मक पद्धतीने फायदा करून घ्यायचा आहे. सामन्याच्या ६० मिनिटांत आपली एकच जबाबदारी आहे ती म्हणजे, खेळावर लक्ष केंद्रित करणं. भावना नियंत्रणात ठेवून शिस्तबद्ध हॉकी खेळणं महत्त्वाचं आहे. एकदा आखलेली रणनीती बदलायची नाही आणि खेळाची लयही बिघडू द्यायची नाही, असंही हरमनप्रीतने स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Face Care: महागडा फेसवॉश कशाला? फक्त ३ गोष्टी आणि तयार होईल राइस फेसवॉश, चेहरा दिसेल नॅचरली ग्लोइंग

Pune : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १६ आस्थापनांचे परवाने निलंबित

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; राज्यातील बड्या मंत्र्याचं मोठं विधान, थेट भाजपला डिवचलं

Kitchen Cleaning : चिकट, तेलकट आणि पिवळं पडलेलं किचन? या टिप्सने झटपट करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT