भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉक्सिंग डे टेस्ट खेळवण्यात येतेय. या सामन्यात सध्या भारताने चांगलंच कमबॅक केलं असून ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळवलंय. आज या सामन्याचा चौथा दिवस असून सामन्याच्या सुरुवातीलाच एक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस भर मैदानात थेट अंपायरशी भिडला.
बॉक्सिंग डे टेस्टच्या चौथ्या दिवशी थर्ड अंपायरने दिलेला निर्णय पालटल्याने पॅट कमिन्सला धक्का बसला. भारताचा पहिला डाव गुंडाळण्याचा प्रयत्न करताना पॅट कमिन्सने 119 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजकडे फुल लेंथ बॉल टाकला. यावेळी बॉलला त्याच्या बॅटची किनार लागली आणि बॉल दुसऱ्या स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे गेला. स्टीव्ह स्मिथने कोणतीही चूक केली नाही आणि त्याने मोहम्मद सिराजचा कॅच घेतला.
यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं. परंतु मैदानावरील अंपायर मायकेल गॉफने तो बंप बॉल होता की नाही याची खात्री करण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला. यावेळी ऑस्ट्रेलियाची टीम पॅव्हेलियनच्या दिशेने निघाली होती. थर्ड अंपायरचा निर्णय पडद्यावर येताच सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले.
रिप्ले पाहिल्यानंतर, थर्ड अंपायरने मोहम्मद सिराजच्या आऊटचा निर्णय रद्द केला. थर्ड अंपायर शराफुद्दौला यांनी मोहम्मद सिराजला नाबाद घोषित केलं आणि म्हणाले, 'मी चेंडू मागच्या बाजूला आपटल्याच्या नंतर पाहू शकतो. मी समाधानी आहे.' या निर्णयामुळे कमिन्स आणि टीम चांगलीच गोंधळली.
पॅट कमिन्सने पुन्हा एकदा मैदानी अंपायर मायकेल गॉफ यांच्याकडे DRS ची मागणी केली. परंतु मैदानावरील पंच मायकेल गॉफ आणि अंपायर जोएल विल्सन यांनी पॅट कमिन्सचे अपील फेटाळून लावलं. या वेळी पॅट कमिन्स अंपायरशी भिडला. त्याला अंपायरच्या रिव्ह्यूवर डीआरएस घ्यायचा होता. मात्र मैदानातील दोन्ही अंपायरने त्याला मनाई केली. कारण दुसऱ्यांदा तपासण्यासाठी असा कोणता पर्याय नाहीये.
थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट आणि रवी शास्त्री देखील आश्चर्यचकित झाले होते. ॲडम गिलख्रिस्ट ऑन एअर म्हणाला, 'हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी यापूर्वी असं काहीही पाहिलं नव्हतं. मला वाटतं ह्याचा खूप बारकाईने विचार व्हायला हवा. तर रवी शास्त्री म्हणाले, 'अंपायर म्हणाले की मी बॅटला लागल्यानंतर बॉल उसळताना पाहिला. हा निर्णय फार लवकर घेतला गेला, फक्त दोन रिप्लेंमध्ये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.