ग्लेन मॅक्सवेल हे नाव ऐकलं की आजही क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो वानखेडेवरचा ऐतिहासिक क्षण... पायात प्रचंड वेदना, शरीर साथ देत नसतानाही लंगडत-लंगडत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करणारा आणि एकट्याच्या जीवावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणारा मॅक्सवेल! आपल्या जिद्दीने आणि झुंजार खेळीने क्रिकेटविश्वाला थक्क करणाऱ्या याच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
'फायनल वर्ल्ड पॉडकास्ट'वर बोलताना मॅक्सवेलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेताना थोडं दुःख होत असल्याचं मॅक्सवेलने सांगितलंय. मात्र आपण क्रिकेटमधून कधी ना कधी निवृत्त होणार, याची कल्पना आधीपासूनच होती, असंही त्याने स्पष्ट केलंय.
मॅक्सवेलने यावेळी सांगितलं की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच व्हिक्टोरियासाठी देशांतर्गत 50 ओव्हर्सचे आणि चार दिवसीय क्रिकेट खेळणंही आता थांबवत आहे. हा निर्णय घेताना थोडं दुःख होत आहे. मात्र हा निर्णय जवळपास ठरलेलाच होता. टेस्ट आणि चार वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय कोणालाही फारसा आश्चर्याचा वाटणार नाही."
या निर्णयाबाबत ऑस्ट्रेलिया टीम व्यवस्थापनासोबत याआधीही अनेकदा चर्चा झाल्याचे मॅक्सवेलने सांगितलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीबाबत चर्चा झाली होती. मात्र, निवृत्ती घेण्यासाठी त्याच्यावर कोणताही दबाव नव्हता. टीम मॅनेजमेंट भविष्यातील संघ तयार करण्यावर लक्ष देत होते. त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी दिली जात होती. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्येही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
ग्लेन मॅक्सवेलच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खास खेळी म्हणजे 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केलेले नाबाद 201 रन्स. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 292 रन्सचं लक्ष्य होतं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था खराब झाली होती. टीमने अवघ्या 91 रन्सवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलिया हा सामना हरणार, असंच चित्र दिसत होतं. अशा कठीण परिस्थितीत मॅक्सवेलने एकट्याने सामना फिरवला.
त्याने 128 चेंडूंमध्ये नाबाद 201 रन्स केले. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 सिक्स लगावले. या सामन्यात मॅक्सवेलला मसल्स क्रॅम्पचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला नीट धावताही येत नव्हतं. तरीही त्याने हार मानली नाही. कर्णधार पॅट कमिन्सला सोबत घेत आठव्या विकेटसाठी नाबाद 202 रन्सची भागीदारी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यापूर्वीच मॅक्सवेलने जून 2025 मध्ये वनडे क्रिकेटला अलविदा केला होता. भारताविरुद्ध दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना होता. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एप्रिल 2026 मध्ये जाहीर केलेल्या केंद्रीय कराराच्या यादीतही मॅक्सवेलला स्थान दिलं नव्हतं.
याच वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅक्सवेल शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या जर्सीत दिसला होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची टीम साखळी फेरीतूनच बाहेर पडला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सिरीजसाठीही त्याची निवड झाली नव्हती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि व्हिक्टोरियासाठी देशांतर्गत क्रिकेट सोडण्याचा निर्णय मॅक्सवेलने घेतला असला तरी फ्रँचायझी क्रिकेटमधून तो निवृत्त झालेला नाही. जगभरातील वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये तो खेळताना दिसणार आहे. सप्टेंबरमध्ये त्याने युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये बेलफास्ट वुल्व्ह्स टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तो व्हिक्टोरियाकडून दोन वनडे कप सामन्यांमध्येही खेळला.
व्हिक्टोरियासाठी शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांना निवृत्तीच्या निर्णयाबद्दल सांगितले. त्यावेळी तो भावूक झाला होता. व्हिक्टोरियाच्या खेळाडूंनी आणि राज्याने संपूर्ण कारकिर्दीत आपल्याला खूप साथ दिली, असं त्याने सांगितलं. याबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यांत अश्रूही आले होते.
आता आपल्या शरीराची अधिक काळजी घ्यायची आहे, असंही मॅक्सवेलने सांगितलंय. कारकिर्दीतील उरलेल्या टी-20 स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी स्वतःला फिट ठेवण्यावर त्याचा भर असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.