आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. जेतेपदासाठी भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ही ट्रॉफी कोण उंचावणार हे येत्या ३ दिवसात कळेलच.
भारताने पहिल्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मॅट हेनरी दुखापतग्रस्त झाला आहे.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये हाय स्कोरिंग सामना पार पडला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज मॅट हेनरी दुखापतग्रस्त झाला आहे. त्याने या सामन्यात हेनरिक क्लासेनला बाद करण्यासाठी डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. हा झेल घेत असताना, तो खांद्यावर आपटला. यादरम्यान त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्यावेळी तो वेदनेने कळवळताना दिसून आला.
झेल पकडल्यानंतर तो मैदानाबाहेर गेल्याचं दिसून आलं. यासह फिजिओसोबत त्याने बराच वेळ घालवला. मॅट हेनरी फायनलच्या सामन्यातून बाहेर झाल्याची कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र त्याच्या वेदना पाहता, तो पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. असं झालं, तर न्यूझीलंडला मोठा धक्का बसेल. कारण मॅट हेनरी चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यने २ गडी बाद केले होते. तर भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४२ धावा खर्च करुन ५ गडी बाद केले होते. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याने २ गडी बाद केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना ९ मार्चला होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २ वेळेस आयसीसीच्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान न्यूझीलंडने दोन्ही वेळेस बाजी मारली आहे. यावेळी भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.