Israel Iran tensions explained : गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसणाऱ्या अमेरिका-इराण वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. आज सकाळी अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ला केला. इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे. तेहरानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले असून शहराच्या विविध भागांतून धुराचे लोट येत आहेत. या हल्ल्याला इराणकडून कसे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. "युद्धाची सुरुवात तुम्ही केली असली, तरी त्याचा शेवट आम्ही करू," असा आक्रमक पवित्रा इराणने घेतला आहे.
आज पहाटेपासूनच अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणमधील अण्वस्त्र तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तेहरानमध्ये झालेल्या भीषण स्फोटांनी संपूर्ण आखाती देश हादरले आहेत. या परिस्थितीमुळे 'जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का?' असा सवाल उपस्थित होत आहे. हवाई हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दांत बजावले आहे की, "शस्त्र टाका आणि शरण या, नाहीतर मृत्यूला सामोरे जा."
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी ही कारवाई केल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणला थेट इशारा देतानाच, इराणी जनतेला सरकार उलथवून टाकण्याचे आवाहनही केले आहे. इराणच्या अण्वस्त्र प्रसार आणि क्षेपणास्त्र चाचण्यांच्या मुद्द्यावरून अमेरिकेने इराणला १०-१५ दिवसांची 'डेडलाईन' दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. सध्या इराणने आपली हवाई हद्द (Airspace) पूर्णपणे बंद केली आहे.
इस्रायलमध्ये ४८ तासांची देशव्यापी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. इराणकडून होणाऱ्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. खबरदारी म्हणून अनेक रुग्णालये जमिनीखाली (Underground) हलवण्यात आली आहेत. दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरानसह कोम (Qom), इस्फाहान (Isfahan) आणि कारज (Karaj) या शहरांवरही हल्ले झाले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयांजवळही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
तेहरान-इस्रायल हल्ल्यांदरम्यान भारताने इस्रायलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व भारतीयांनी सुरक्षित आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. रहिवाशांना ठरवून दिलेल्या ठिकाणीच राहणाचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि स्थानिक बातम्या आणि अधिकृत सूचनांचे निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत, नागरिक +972-54-7520711 वर किंवा cons1.telaviv@mea.gov.in या ईमेल पत्त्यावर 24x7 हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात. अपडेटेड सूचना आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे https://oref.org.il/eng वर उपलब्ध आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.