Kitchen Tips : आले-लसूण पेस्ट लवकर खराब होतेय? जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

How to store homemade ginger garlic paste : स्वयंपाकात होणारी घाई वाचवण्यासाठी आपण घरीच आले-लसूण पेस्ट बनवून ठेवतो, पण ती लवकर काळी पडते किंवा खराब होते. पेस्ट अनेक महिने ताजी राहावी यासाठी या खास किचन ट्रिक्स नक्की वापरून पहा.
how to store homemade ginger garlic paste for a long time
how to store homemade ginger garlic paste for a long timesaam tv
Published On: 

भारतीय स्वयंपाकघरात आले-लसूण पेस्टचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. भाजी, आमटी, ग्रेव्ही किंवा मॅरिनेशन अशा अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी या पेस्टचा उपयोग होतो. त्यामुळे अनेकजण एकाच वेळी भरपूर आले-लसूण पेस्ट तयार करून फ्रिजमध्ये बनवून ठेवतात. मात्र, काही दिवसांतच या पेस्टचा रंग, चव आणि सुगंध बदलू लागतो. काही वेळा पेस्टला आंबट वास येतो किंवा त्यावर बुरशीदेखील तयार होते.

अशा वेळी आले-लसूण पेस्ट जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी तिची योग्य पद्धतीने साठवणूक करणे गरजेचे आहे. पेस्ट तयार करण्यापासून ते फ्रिजमध्ये ठेवण्यापर्यंत काही गोष्टींची काळजी घेतल्यास ती लवकर खराब होण्यापासून वाचवता येऊ शकते. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स.

how to store homemade ginger garlic paste for a long time
Health Tips : किडनी स्टोनचा धोका वाढवतात रोजच्या 'या' ७ सवयी; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

पेस्ट तयार करताना ही काळजी घ्या

आले-लसूण पेस्ट बनवण्यासाठी नेहमी ताजे आणि चांगल्या प्रतीचे आले व लसूण वापरा. सुकलेले, जुने किंवा खराब झालेले आले-लसूण वापरणे टाळा. सर्वप्रथम आले आणि लसूण स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. त्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा किचन टॉवेलने ते पूर्णपणे कोरडे करा. आले-लसूण वाटताना शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करा. पेस्टमध्ये जास्त ओलावा राहिल्यास ती लवकर खराब होण्याची शक्यता असते.

काचेच्या हवाबंद डब्यात ठेवा

आले-लसूण पेस्ट साठवण्यासाठी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडा काचेचा हवाबंद डबा वापरणे चांगले ठरते. काचेच्या डब्यात पदार्थांचा वास तुलनेने कमी प्रमाणात राहतो आणि डबा स्वच्छ करणेही सोपे असते. पेस्ट एकाच मोठ्या डब्यात भरण्याऐवजी लहान-लहान डब्यांमध्ये विभागून ठेवा. त्यामुळे गरजेपुरतीच पेस्ट बाहेर काढता येते आणि उर्वरित पेस्ट वारंवार हवेच्या संपर्कात येत नाही.

फ्रिजमध्ये ठेवताना करू नका ही चूक

आले-लसूण पेस्ट काही दिवस वापरायची असल्यास ती हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. मात्र, फ्रिजच्या दरवाजामध्ये ठेवण्याऐवजी आतील थंड भागात ठेवणे अधिक योग्य ठरते. कारण दरवाजा वारंवार उघडल्यामुळे तापमानात बदल होत असतो.पेस्ट काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा. ओल्या किंवा वापरलेल्या चमच्यामुळे पेस्टमध्ये अतिरिक्त ओलावा आणि जंतू जाण्याची शक्यता वाढते.

फ्रीजरचा वापर करा

तुम्ही एकाच वेळी जास्त प्रमाणात आले-लसूण पेस्ट तयार केली असेल, तर ती फ्रीजरमध्ये साठवू शकता. यासाठी आइस क्यूब ट्रेमध्ये पेस्टचे छोटे-छोटे भाग भरून ठेवा. पेस्टचे क्यूब पूर्णपणे गोठल्यानंतर ते बाहेर काढून हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे स्वयंपाक करताना गरजेपुरते क्यूब बाहेर काढता येतात. संपूर्ण डबा वारंवार बाहेर काढण्याची गरज पडत नाही.

how to store homemade ginger garlic paste for a long time
Silk Saree Care : महागड्या सिल्क साड्या घरच्या घरी कशा स्वच्छ कराल? रंग आणि चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत

मीठ, तेल आणि लिंबाचा रस वापरा

आले-लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी काहीजण त्यात थोडे मीठ, तेल किंवा लिंबाचा रस मिसळतात. मिठामुळे आणि लिंबाच्या रसातील आम्लतेमुळे पेस्टच्या साठवणुकीस मदत होऊ शकते. तेलामुळे पेस्टच्या पृष्ठभागावर एक थर तयार होतो. मात्र, केवळ मीठ, तेल किंवा लिंबाचा रस घातल्याने पेस्ट सुरक्षित राहीलच असे नाही. योग्य तापमानात साठवणूक करणे आवश्यक आहे.

पेस्ट बाहेर ठेवू नका

आले-लसूण पेस्ट जास्त काळ चांगली ठेवायची असेल, तर ती खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवू नका. स्वयंपाकासाठी आवश्यक तेवढीच पेस्ट बाहेर काढा आणि लगेच डबा पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा. तसेच जुन्या पेस्टमध्ये नवीन तयार केलेली पेस्ट मिसळू नका.

पेस्ट खराब झाल्याची ही आहेत लक्षणे

आले-लसूण पेस्टचा रंग बदलला असेल, आंबट किंवा विचित्र वास येत असेल, तिचा पोत बदलला असेल किंवा पेस्टवर बुरशी दिसत असेल, तर ती वापरू नका. पेस्टमधून जास्त प्रमाणात पाणी सुटत असल्यासही तिची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.