मेरठमध्ये डॉक्टरांनी चिमुकल्याच्या जखमेवर फेविक्विक लावल्याने संताप
पालकांनी हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर टीका केली
फेविक्विकमुळे मुलाला तीव्र वेदना व डोळा धोक्यात
तीन तास प्रयत्नांनंतर फेविक्विक काढून टाके घातले
उत्तर प्रदेशातील मेरठ येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टरने एका चिमुकल्या मुलावर उपचार करताना फेविक्विक वापरल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने पालकांनी संताप व्यक्त केला असून डॉक्टरला सुद्धा धारेवर धरलं आहे. या प्रकरणानंतर लोकांचा जीव वाचवणारे डॉक्टरच लोकांच्या जीवावर उठले असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही मेरठमधील जागृती विहार एक्सटेंशनमधील मेपल्स हाइट्समध्ये घडली. फायनान्सर सरदार जसविंदर सिंग यांचा अडीच वर्षांचा मुलगा मनराज संध्याकाळी घरी खेळत असताना त्याला टेबलचा कोपरा लागला. त्याच्या डोळ्याला लागल्याने त्यातून रक्त येऊ लागलं. कुटुंबीयांनी तातडीने मुलाला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेलं.
या रुग्णालयात एका डॉक्टरने जखमी मुलावर उपचार करताना त्याच्या जखमेवर फेविक्विक लावलं. त्यामुळे मुलाच्या डोळ्याला वेदना होऊ लागल्या. कुटुंबाचा आरोप आहे की, तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी जखमेची नीट तपासणी आणि प्रथमोपचार केले नाही. शिवाय त्यांनी जखमी मुलाच्या पालकांना बाहेरून पाच रुपयांचं फेविक्विक आणण्यास सांगितलं. कुटुंबाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून ते आणलं. जखम साफ करण्याऐवजी, डॉक्टरांनी लागलेल्या जागेवर फेविक्विक चिकटवलं.
दुसऱ्या दिवशी मुलाला वेदना होऊ लागल्या. मुलाची अस्वस्थता पाहून पालकांची चिंता वाढत गेली. सकाळी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेलं. जेव्हा डॉक्टरांना कळलं की फेविक्विक जखमेवर लावण्यात आलं आहे, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की परिस्थिती अत्यंत धोकादायक असू शकते. जर फेविक्विक थोडसं तरी डोळ्यात गेलं असतं तर मुलाच्या दृष्टीवर परिणाम झाला असता.
रुग्णालयातील डॉक्टरांना मुलाच्या डोळ्यावरील फेविक्विक काढण्यासाठी जवळजवळ तीन तास लागले. डॉक्टरांनी काळजी घेत मुलाच्या त्वचेला आणि डोळ्यांना नुकसान होऊ नये म्हणून फेविक्विक हळूहळू काढून टाकला. फेविक्विक काढून टाकल्यानंतर, जखम दिसली आणि डॉक्टरांनी ताबडतोब चार टाके घातले. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.