Nitin Gadkari on Trucks: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून रस्त्यावर चालणाऱ्या सर्व ट्रक आणि कंटेनरच्या केबिनमध्ये एसी बसवणे अनिवार्य आहे. या वाहनांची केबिन पूर्णपणे एसी असावी, असं गडकरी यांनी सांगितलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. गडकरींच्या या घोषणेमुळे ट्रकचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून भारतातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच ट्रक चालकांची कामाची खडतर परिस्थिती आणि रस्त्यावर जास्त वेळ वाहन चालवण्याचा थकवा हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
अशातच नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, "आपल्या देशातील काही ड्रायव्हर १२ किंवा १४ तास ट्रक चालवत असतात. तर इतर देशांमध्ये बस आणि ट्रक ड्रायव्हरला वाहन चालवण्यासाठी काही तासांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आपल्या देशातील ट्रकचालक ४३ ते ४७ अंश तापमानात गाडी चालवतात".
"आपण या ट्रक चालकांच्या स्थितीची कल्पना केली पाहिजे. मी मंत्री झाल्यानंतर एसी केबिन सुरू करण्यास उत्सुक होतो. मात्र त्यामुळे खर्च वाढणार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध केला. आता मी फाईलवर सही केली आहे, की सर्व ट्रक केबिन एसी केबिन असतील".
नितीन गडकरी म्हणाले की, "लवकरच ट्रक (Truck) चालकांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. देशातील वाहतूक क्षेत्रात चालकाची मोठी भूमिका आहे. भारतामध्ये वाहतूक क्षेत्राचे खूप महत्वाचे योगदान आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीत वाहतूक क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे".
दरम्यान, सध्या वाहतूक क्षेत्रात व्होल्वो आणि स्कॅनिया सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेले हाय-एंड ट्रक आधीच एसी ट्रक केबिनसह येतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर वाद सुरू असल्याने बहुतांश भारतीय कंपन्या या प्रकरणात पुढे जाण्यास कचरत होत्या. मात्र, सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक केबिन एसी अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची घोषणा केली. त्यामुळे आता २०२५ पासून रस्त्यावर चालणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये एसी असणे अनिवार्य आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.