तमिळनाडूमध्ये भयंकर स्फोटाची घटना घडली
गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटल्याने भीषण आग
एकामागून एक सिलिंडरचे स्फोट झाले
या स्फोटाचा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. ही स्फोटाची घटना ताजी असतानाच तमिळनाडूमध्ये देखील भयंकर स्फोट झाला. सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटला. त्यानंतर भडका उडून एकापाठोपाठ एक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दोन किलो मीटरपर्यंतचा परिसर हादरला. या स्फोटामुळे आसपासच्या गावामध्ये भीतीचे वातावरण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात घडली. या जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वरनवासी गावाजवळील एका वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यात उलटला. त्यामुळे ट्रकमध्ये असणारे सिलिंडर एकमेकांवर आदळले आणि भडका उडला. त्यामुळे एकापाठोपाठ एक सिलिंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण ट्रकला आग लागली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकही घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. चालकाने वेळीच ट्रकमधून उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचला. पण तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला अरियालूर सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे आसपासच्या गावातील घराच्या खिंडक्यांच्या काचा फुटल्या. जमीन हादरल्यासारखे वाटल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सिलिंडर आणि ट्रकने पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकू गेले त्यामुळे लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच जण घाबरले होते.
अरियालूर अग्निशमन आणि बचाव सेवांच्या अनेक पथके घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर आग अशीच पसरत राहिली असती तर ती जवळच्या वस्त्यांमध्ये गेली असती आणि मोठे नुकसान झाले असते. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.