जम्मू - काश्मीरच्या श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवरमध्ये मोठी दुर्घटना घडली. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळं पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. बोटीतील पर्यटक पाण्यात पडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
दल सरोवरमध्ये पर्यटकांची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. सुसाट वाऱ्यामुळं बोट उलटली. त्यातील पर्यटक सरोवरमधील पाण्यात पडले. काही पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक आणि पोलिसांच्या माध्यमातून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. सरोवरमध्ये उलटलेल्या बोटीत नेमके किती पर्यटक होते, याची आकडेवारी समोर आली नाही.
व्हिडिओत काय?
दल सरोवरमधील दुर्घटनेचा १७ सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरोवरालगत असलेल्या रेलिंगजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. काही लोक मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना या व्हिडिओत दिसून येते. दुसरीकडे, सरोवरमध्ये उलटलेली बोट दिसत आहे. काही लोक पाण्यात पडले असून, ते बचावासाठी धावा करत आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी काठावर असलेल्या गर्दीतील माणसं आरडाओरडा करत आहेत.
एप्रिलमध्येही दुर्घटना
एप्रिल २०२५ मध्ये देखील दल सरोवरमध्ये अशीच एक घटना घडली होती. एक कुटुंब दल सरोवराची बोटीतून सफर करत होते. वेगवान वाऱ्यामुळे त्यांची बोट उलटली होती. चार पर्यटक आणि एक नाविक या बोटीतून प्रवास करत होते. त्यांना वाचवण्यात यश आले होते.
नोव्हेंबर २०२३ मध्ये दल सरोवरमध्ये अशाच एका घटनेत तीन बांगलादेशी पर्यटकांचा मृत्यू झाला होता. एका हाउसबोटीला आग लागली होती. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये देशभरासह परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन हे या राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. दल सरोवर हे येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र, वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.