IMD travel advisory for fog saam tv
देश विदेश

कुठे धुकं, तर कुठे मुसळधार पाऊस! २८ नोव्हेंबरला देशात हवामानाचा मोठा उलटफेर

IMD Weather Forecast For November 28 In India: २८ नोव्हेंबर रोजी देशातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्यांसाठी थडी आणि धुक्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 28 नोव्हेंबरच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून दिल्ली NCR, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी घनदाट धुके पडण्याचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये 50 ते 200 मीटरपर्यंत दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही दिसून येऊ शकतो. हिमाचल प्रदेशमध्येही पुढील काही दिवस धुक्याचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

धुक्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होऊन वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच रेल्वे आणि विमानसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी लवकर आणि रात्री प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये उद्या हवामान कसे असेल?

दिल्लीमध्ये शनिवारी सकाळची सुरुवात धुक्याने होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 28 नोव्हेंबर रोजी राजधानीत घनदाट धुक्याचा अंदाज वर्तवला आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत रस्त्यांवर धुक्याची चादर पसरू शकते. त्यामुळे कार्यालयात जाणारे कर्मचारी आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येऊ शकतात. रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यातच प्रदूषणामुळे डोळे आणि श्वसनासंबंधी त्रास वाढण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये उद्या हवामान कसे असेल?

पंजाबमध्ये 28 नोव्हेंबर रोजी काही भागांत सकाळी आणि रात्री घनदाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या अडचणी वाढू शकतात. हवामान विभागाने प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दिवसा हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, वाहन चालवताना फॉग लाइटचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

हरियाणामध्ये उद्या हवामान कसे असेल?

हरियाणामध्ये 28 नोव्हेंबर रोजी थंडीसोबत धुक्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी धुक्याची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे दिल्ली-चंदीगडसह इतर प्रमुख मार्गांवर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रेल्वे प्रवाशांनीही घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या ट्रेनची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिवसभर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशमध्ये उद्या हवामान कसे असेल?

उत्तर प्रदेशात सकाळी आणि रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवण्यात आले होते. आता हवामान विभागाने पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांसाठी घनदाट धुक्याचा इशारा दिला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये उद्या हवामान कसे असेल?

हिमाचल प्रदेशातील डोंगराळ रस्त्यांवर धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा लक्षणीय कमी नोंदवण्यात आले होते. 28 नोव्हेंबर रोजी काही भागांत घनदाट धुके पडण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तमिळनाडूमध्ये उद्या हवामान कसे असेल?

उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता असताना दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. हवामान विभागाने 28 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत मुसळधार पाऊसही पडू शकतो. यावेळी मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केरळमध्ये उद्या हवामान कसे असेल?

केरळ आणि माहे परिसरात शनिवारी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात, भाजीपाला आणि बागायती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये उद्या हवामान कसे असेल?

कर्नाटकमध्ये सर्वच भागांत एकसारखे हवामान राहणार नाही. किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होऊ शकतो. दक्षिणेकडील भागांतही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी स्थानिक हवामानाचा अंदाज तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशमध्ये उद्या हवामान कसे असेल?

आंध्र प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा या भागांत पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या भागांतील अनेक ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा लक्षणीय कमी नोंदवण्यात आले होते. पावसामुळे हवेत आर्द्रता कायम राहू शकते. मात्र, संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.

त्रिपुरामध्ये उद्या हवामान कसे असेल?

ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातही धुक्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 28 नोव्हेंबर रोजी काही भागांत घनदाट धुक्याचा इशारा दिला आहे. सकाळी आणि रात्री धुक्याची तीव्रता अधिक असू शकते. त्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होऊन वाहनचालकांना अडचणी येऊ शकतात. दिवसा हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सकाळी लवकर प्रवास करणाऱ्यांनी वाहनांचा वेग कमी ठेवावा आणि पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख खान-करीना कपूरचा १५ वर्षांनंतर कमबॅक; 'किंग'मधील 'डॅडी कूल' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Saturday Horoscope: आज कोणाला मिळणार नवीन जबाबदारी? काहींच्या वैवाहिक आयुष्यात वाढणार आनंद? वाचा राशीभविष्य

राष्ट्रवादीत फूट टाळण्यासाठी शरद पवार मोठा निर्णय घेणार? थेट मोदी सरकारला...;

Maharashtra News Live Update: शरद पवार मुंबईतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

Director Death: चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अकाली निधन, चित्रपटसृष्टीला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT