Gautami Adani son Jeet simple wedding SaamTV
देश विदेश

Gautam Adani Son Marriage : देशात श्रीमंत असलेल्या अदानींच्या मुलाचं साधेपणाने लग्न; सामाजिक कार्यासाठी दिले तब्बल १० हजार कोटी रुपये

Gautam Adani Son Jeet Marriage News : आपल्या मुलाचा विवाह साधेपणे होईल असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे हा विवाह अत्यंत भपकेबाज आणि खर्चिक पद्धतीने होईल या अफवांनाही पूर्णविराम दिला होता.

Prashant Patil

अहमदाबाद : आपल्या मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी महाकुंभमेळ्यातील आपल्या भेटीदरम्यान जाहीर केले होते. त्या शब्दाला जागून अदाणी यांनी या विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले.

आपल्या मुलाचा विवाह साधेपणे होईल असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे हा विवाह अत्यंत भपकेबाज आणि खर्चिक पद्धतीने होईल या अफवांनाही पूर्णविराम दिला होता. जीत गौतम अदाणी यांच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल. गौतम अदाणी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. सेवा साधना है, सेवा प्रार्थना है और सेवा ही परमात्मा है, या गौतम अदाणींच्या तत्वानुसार या निधीतून कशा प्रकारे समाजसेवा करावी हे ठरवण्यात आले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होईल. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील.

मुलाच्या विवाहाप्रसंगी गौतम अदाणी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या

परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात झाला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. मुलगी दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे.

या ट्वीटमध्ये गौतम अदाणी यांनी आपली सूनबाई दिवा हिचा उल्लेख मुलगी असा केला, हे उल्लेखनीय आहे असे दाखवून दिले जाते. अहमदाबाद मधील अदाणी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लब मध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला. विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा याची दिवा ही कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. त्याला फक्त जवळचे नातलग आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या विवाहास बडे राजकारणी, परदेशी मुत्सद्दी, उद्योजक, सनदी अधिकारी, चित्रपट तारे तारका, करमणूक करणारे व्यावसायिक आणि अन्य सेलिब्रिटींची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती.

जीत अदाणी हा सध्या अदाणी एअरपोर्ट्सचा संचालक आहे. या कंपनीतर्फे सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.जीत याने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलव्हेनियाज स्कूल ऑफ इंजीनियरिंग अॅप्लाईड सायन्स मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदाणी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे ५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य पुरवले जाणार आहे. दरवर्षी एवढेच सहाय्य दिले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत याने या उपक्रमाची सुरुवात करताना २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना सहाय्य दिले.

जीत आणि दिवा यांनी विवाहानिमित्त समाजसेवी उपक्रमांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात केली, याबद्दल गौतम अदाणी यांनी देखील ट्विटद्वारे समाधान व्यक्त केले होते. गौतम अदाणी प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात २१ जानेवारी रोजी सहभागी झाले होते. तेव्हा, त्यांचा मुलगा जीत याच्या विवाहानिमित्त देखील सेलिब्रिटींचा महा कुंभमेळा जमेल का ? असे त्यांना विचारल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आम्ही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहोत. जीत येथे फक्त गंगामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला आहे. त्याचा विवाह परंपरागत पद्धतीने साधेपणानेच होईल, असेही ते ठामपणे म्हणाले होते. त्यानुसार हा विवाह साधेपणाने झाला. स्वतःपेक्षा सेवा मोठी या गौतम अदाणी यांच्या तत्त्वानुसार केलेली कृती म्हणजे, बड्या व्हीआयपी मंडळींचे विवाह कसे असावेत, याचे एक उदाहरणच असल्याचे बोलले जाते. समाजसेवेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षणही कसे साजरे करावेत, याची व्याख्या अदाणी यांनी विचारपूर्वक बदलली असल्याचे दाखवून दिले जात आहे. संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी विचारपूर्वक समाजसेवेवर भर देऊन वेगळाच आदर्श निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT