पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण
रुचिका सिंगविरोधात गुन्हा दाखल
जंतर- मंतरवरील आंदोलनादरम्यान केले होते आक्षेपार्ह विधान
नोएडा पोलिसांकडू झिरो एफआयआर दाखल
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका २५ वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने पीएम मोदी यांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह विधान केले होते. सोशल मीडियावर या तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. आता नोएडा पोलिसांनी तिच्याविरोधात झिरो एफआयआर दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका सिंग असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. रुचिकाने २३ जुलै रोजी जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात पीएम मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. बुधवारी तिच्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेसंदर्भात गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील रहिवासी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील स्मृती सिंह यांनी दिल्लीत तक्रार दाखल केली.
तक्रारदाराने या तक्रारीत म्हटले आहे की, 'तिच्या वक्तव्यांमुळे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला असून त्यामुळे अशांतता पसरून सार्वजनिक शांतता भंग होऊ शकतो. त्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करा.' नोएडा येथील एक्सप्रेसवे पोलिस स्टेशनमध्ये शांतता भंग करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक उपद्रवाला चालना देणारी विधाने आणि बदनामी करणे यासंबंधीच्या कलमांखाली रुचिका सिंगविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली. ही एफआयआर पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रुचिका सिंगविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले की, रुचिका सिंग यांचे वक्तव्य चुकीचे असू शकते, परंतु अशा प्रकारची कारवाई केली जाऊ नये. जर कोणतीही अपमानजनक भाषा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्तीला त्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आंदोलकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी फौजदारी यंत्रणेचा वापर करणे अत्यंत निंदनीय आहे आणि केवळ आक्षेपार्ह भाषेसाठी कोणालाही शिक्षा होऊ नये.'
सौरभ दास यांनी पुढे सांगितले की, 'मी असे म्हणत नाही की ती भाषा योग्य आहे. ती भाषा चुकीची असू शकते. ती कोणालातरी आक्षेपार्ह वाटू शकते परंतु अशा लोकांविरुद्ध फौजदारी यंत्रणा वापरण्याचे ते कारण नाही. यामुळे एक भीतीदायक वातावरण निर्माण होते. मला वाटत नाही की हे कोणालाही, विशेषतः तरुण पिढीला मान्य आहे. मी तरुण पिढीतील सर्वांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शब्दांबाबत आणि सर्वसामान्य लोकांविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांच्या व वाक्यांच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.