जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतं. हातात असतं तो फक्त मधला काळ. कधी, कुणासोबत काय घडेल सांगता येत नाही. घरातून बाहेर पडताना कुणाचा मृत्यू होऊ शकतो. तर कुणी झोपेतच आपला श्वास सोडतो. झोपेतच तडफडून कसा मृत्यू होतो? हे भोपाळच्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या घटनेतून स्पष्ट होतं. 3 डिसेंबर रोजी घडलेली घटना आठवली की, अजूनही निष्पाप लोकांना झालेला त्रास आणि तडफडून झालेला मृत्यूंचा आकडा डोळ्यांसमोर येतो. त्या रात्री नक्की काय घडलं होतं? वायूगळतीमुळे निष्पाप जीवांचा कसा मृत्यू झाला? पाहा.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये अनेपेक्षित घटना घडली. युनियन कार्बाईड फॅक्टरी जवळ अनेक वस्त्या आहेत. 3 डिसेंबर 1984 च्या मध्य रात्री फॅक्टरीतल्या टँक नंबर ६१० मधून वायू गळती झाली. विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आला. रासायनिक प्रक्रियेमुळे टँकमध्ये दाब निर्माण झाला, आणि टाकी उघडली. त्यातून वायू गळती झाली. विषारी वायू क्षणार्धात हवेत मिसळून पसरायला लागली. ज्याचा अधिक फटका तेथील जवळच्या वस्त्यांना बसला.
झोपडपट्टीतील रहिवासी आणि कामगारांचा अचानक श्वास कोंडला. लोक झोपेतच तडफडू लागली. काही बिछाना सोडून सैरावैरा धावू लागले. तर महिला बुरखा, साड्या आणि मुलांना सावरत, जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले.
काहींनी कामाच्या शोधात भोपाळ गाठलं होतं. पण त्यांचा मृत्यू असा वायू गळतीमुळे होईल, असं त्यांच्या स्वप्नातही कधी आलं नसावं. त्या काळ रात्रीत काही लोक मृत्यूच्या दाढेत ओढवले गेले तर, काही आपला जीव मुठीत घेऊन रुग्णालयात पोहचले.
मिथाईल आयसोसायनाइट वायू बाधित रुग्णांवर नेमके कोणते उपचार करावे हे सुरुवातीला डॉक्टरांना कळत नव्हतं. कारण काही जण रक्ताच्या उलट्या करत होते. तर काहींना श्वास घ्यायला जड जात होतं. विषारी वायूमुळे त्याकाळी पीडित लोकांना किती त्रास झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही. पण पीडितांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे अथक परिश्रम सुरूच होते.
ही घटना घडताच 3 पत्रकार मैदानात उतरले, आणि त्यांनी जवळून हे भयानक दृश्य पाहिलेत. फ्रीप्रेस जर्नलचे सुरेश मेहरोत्रा, नवभारत टाईम्सचे विजय तिवारी आणि हिंदुस्तान समाचारचे पत्रकार पुष्पराज पुरोहित होते.
त्यांच्या वृत्तानुसार, 'ही घटना एका भयकथेसारखी आहे. वायूगळतीतून जीव वाचवत लोक रुग्णालय गाठत होते. या वायूगळतीमुळे छोला, जयप्रकाश नगर, टीला जमलापुरा, पी अँड टी कॉलनी, सिंधी कॉलनी, कोरध गाव, इब्राहीमपुरा, शांतीनगर, पीर गेट आणि पक्ष कॉलनी ग्रीन पार्क हे भाग जास्त प्रभावित झाले होते.'
या दुर्घटनेमध्ये १५ हजार हून अधिक लोक दगावले. पाच लाखांहून अधिक जखमी झाले. पुढे जाऊन जे वाचले, त्यांना कोणत्या ना कोणत्या आजाराने घेरलं. जे वाचले त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने भारत सरकारने युनियन कार्बाईडकरून 713 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले. असं स्वयंसेवी संस्थाचं म्हणणं आहे.
पण हा निधी 3000 मृत आणि 1 लाख जखमींच्या आकडेवारीवरुन देण्यात आला. त्यामुळे हा निधी पाचपट लोकांमध्ये वाटण्यात आला. शिवाय रक्कम पीडितांना दुर्घटनेच्या 7 -8 वर्षानंतर मिळाल्याचं सेवाभावी संस्था म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.