
EVM Questions And Answers : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सवर (ईव्हीएम) संशय व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांकडून आरोपांची मालिका लावली जातेय. त्यातच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ईव्हीएम हॅक करण्याचा दावा केला जातोय. ईव्हीएममध्ये फेरफार केली जातेय, त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी विरोधकांकडून कऱण्यात येत आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर, काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप लावला. भाजप ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड आणि फेरफार करतेय. काँग्रेसने '99 टक्के बॅटरी लेव्हल' असल्याचे सांगून ईव्हीएममध्ये फेरफार आणि छेडछाडीचा आरोप केला आहे. पण ईव्हीएम खरेच हॅक होऊ शकते का? ईव्हीएममध्ये फेरफार करणं शक्य आहे? मतदानानंतर मतांची संख्या बदलता येईल का? यासारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलाय. टाइम्स ऑफ इंडियाने EVM-संबंधित सर्व प्रश्नांसाठी ब्रिजेश सिंह यांच्यासोबत चर्चा केली. त्याचा तपशील देत आहोत.
प्रश्न- ईव्हीएममध्ये हेरफेर किंवा हॅकिंग शक्य आहे का?
उत्तर- ईव्हीएममध्ये हेरफेर किंवा हॅकिंगचा आरोप अनेक वेळा करण्यात आला आहे. परंतु, निवडणूक आयोग आणि तज्ञांचे म्हणणे आहे की, ईव्हीएम्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. यामध्ये कोणतेही वायरलेस तंत्रज्ञान नाही आणि ती इंटरनेटशी जोडली जात नाही, त्यामुळे बाह्य हॅकिंग किंवा फेरफार करणे शक्य नाही.
प्रश्न- मतदानानंतर मतांची संख्या बदलता येऊ शकते का?
उत्तर- नाही, मतदान झाल्यानंतर मतांची संख्या बदलता येणे शक्य नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम्सच्या प्रमाणित तपासणीसाठी ठेवलेले कर्मचारी, निरीक्षक आणि पर्यवेक्षक यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होते.
प्रश्न- ईव्हीएममधील चिप पूर्वनियोजित असू शकते का?
उत्तर- ईव्हीएममध्ये वन-टाइम प्रोग्रामेबल (OTP) चिप वापरली जाते, जी एकदाच प्रोग्राम केली जाते. हा प्रोग्रामिंग कठोर देखरेखीखाली तज्ज्ञांच्या समितीद्वारे केला जातो. प्रत्येक निवडणुकीपूर्वी 1000 पेक्षा जास्त मॉक पोल घेतले जातात, जे राजकीय पक्षांच्या उपस्थितीत पारदर्शकतेसाठी आयोजित केले जातात.
प्रश्न- निवडणुकीपूर्वी मशीनमध्ये फेरफार कसा टाळता येतो?
उत्तर- ईव्हीएम मजबूत खोल्यांमध्ये 24 तास सीसीटिव्हीच्या देखरेखीखाली आणि सशस्त्र सुरक्षा यंत्रणेसह ठेवली जाते. याशिवाय, यादृच्छिक क्रमाने मशीनची निवड होते, ज्यामुळे कोणालाही मशीन कुठे वापरली जाईल हे माहिती नसते.
प्रश्न- वायरलेस हॅकिंग शक्य आहे का?
उत्तर- भारतीय ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचे वायरलेस घटक नसतात. त्या एअर-गॅप्ड असतात, म्हणजेच नेटवर्कशी पूर्णपणे वेगळ्या असतात, ज्यामुळे हॅकिंग अशक्य होते.
प्रश्न- साठवणुकीदरम्यान मत बदलले जाऊ शकतात का?
उत्तर- ईव्हीएम सुरक्षित खोल्यांमध्ये तीन-स्तरीय सुरक्षेसह ठेवली जाते. डबल-लॉक सिस्टम आणि पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत फक्त अधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जातो.
प्रश्न- ईव्हीएम डुप्लिकेट मशिनसोबत बदलता येते का?
उत्तर- प्रत्येक ईव्हीएमला अद्वितीय क्रमांक, डिजिटल सही आणि होलोग्राफिक सील असते. हे सर्व तपशील निवडणुकीपूर्वी पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पडताळले जातात.
प्रश्न- चुंबकीय हस्तक्षेपाने मतदानावर परिणाम होतो का?
उत्तर- ईव्हीएममध्ये लष्करी दर्जाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक शील्डिंग आहे, ज्यामुळे ते कोणत्याही बाह्य चुंबकीय हस्तक्षेपापासून सुरक्षित असतात.
प्रश्न- अशिक्षित मतदारांसाठी काय उपाय आहेत?
उत्तर- ईव्हीएमवर स्पष्ट चिन्हे आणि पार्टी नावे असतात. मतदानानंतर व्हीव्हीपॅट स्लिपद्वारे मतदार आपला मत पडला आहे की नाही ते तपासू शकतो.
प्रश्न- मतदानानंतर सॉफ्टवेअर अपडेट होऊ शकते का?
उत्तर- ईव्हीएम उत्पादनानंतर कोणत्याही सॉफ्टवेअर अपडेटस स्वीकारत नाही. OTP चिप प्रोग्रामिंग एकदाच होते आणि ती बदलता येत नाही.
प्रश्न- बॅटरी फेल झाल्यास काय होते?
उत्तर- ईव्हीएममध्ये 48 तासांचा बॅकअप असतो. डेटा नॉन-वोलाटाइल मेमरीमध्ये साठवला जातो, त्यामुळे बॅटरी फेल झाल्यासही डेटा सुरक्षित राहतो.
प्रश्न- मतांची परिणाम प्रक्रिया कशी सुरक्षित असते?
उत्तर- मतदानाचे परिणाम सर्वप्रथम मशीनमध्ये नोंदवले जातात. व्हीव्हीपॅट स्लिप्स परिणामांच्या पडताळणीसाठी वापरल्या जातात.
प्रश्न- बॅटरीची 99 टक्के पातळी म्हणजे काय?
उत्तर- बॅटरीवरील 99 टक्के ही पातळी बॅटरीचे कार्यक्षम व्होल्टेज दर्शवते, हे मतदारांच्या डेटावर कोणताही परिणाम करत नाही. ईव्हीएमचा डेटा व्हीव्हीपॅटद्वारे पडताळला जातो, त्यामुळे फेरफार अशक्य आहे. ईव्हीएमच्या या सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनते.
Edited By- नितीश गाडगे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.