झाशीतील बँकेत पूजा वर्मा यांना पाच तास जबरदस्ती बसवून ठेवण्यात आले.
कर्ज हप्ता थकविल्यामुळे बँकेचा दबाव, पोलिसांनी केली महिलेची सुटका.
पूजाचा आरोप – एजंटनी तीन हप्त्यांचे पैसे हडप केले.
बँकेच्या स्पष्टीकरणात जबरदस्तीचा इन्कार, पोलिस तपास सुरू.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील मोंठा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खासगी बँकेने हप्त्याच्या वसुलीसाठी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कर्जाचा हप्ता न भरल्याने बँकेने एका महिलेवर इतका दबाव आणला की तिला तब्बल पाच तास बँकेतच बसवून ठेवण्यात आले.शिवाय पैसे न भरल्यास बायकोला घरी सोडणार नाही असे बँकेकडून संबंधित महिलेच्या पतीला सांगण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बँक कर्मचारी आणि त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बमहरौलीच्या आझाद नगर भागात राहणाऱ्या पूजा वर्मा या महिलेकडून बँकेने कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी अजब पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. पूजा वर्मा हीचा पती रविंद्र वर्मा याने पोलिस हेल्पलाईन ‘डायल ११२’ वर संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. रवींद्र वर्मा याने तक्रारीत म्हटलं, त्याची पत्नी पूजा वर्माला सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून जबरदस्तीने बँकेत बसवून ठेवण्यात आलं होतं. बँक कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणं सांगितलं की, जोपर्यंत पती उरलेल्या कर्जाची रक्कम जमा करत नाही तोपर्यंत महिलेला सोडलं जाणार नाही. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी महिलेची सुटका केली.
पूजाने घेतलेल्या कर्जाची रक्कम ४०,००० रुपये असून, दरमहा हप्ता २,१२० रुपये भरावा लागतो. पूजाने यापैकी ११ हप्ते भरल्याचा दावा केला असून, बँकेने फक्त आठ हप्तेच दाखवले आहेत. उर्वरित तीन हप्त्यांचे पैसे बँकेचे एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी हडप केल्याचा आरोप पूजाने केला. इतकंच नव्हे तर, मध्य प्रदेशातील टिकमगढ येथील बँक सीओ संजय यादव यांनी पूजाच्या घरी येऊन उर्वरित रक्कम भरण्यासाठी तगादा लावल्याचेही तिने सांगितले.
पूजाने असेही म्हटले की, जेव्हा त्यांनी कर्ज भरण्यास नकार दिला, तेव्हा तिला आणि तिच्या पतीला जबरदस्तीने बँकेत आणण्यात आले आणि त्यानंतर पाच तास तिथे थांबवण्यात आले. पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना कोतवाली मोंठ पोलीस ठाण्यात नेले. तिथे पूजाने आपला लेखी तक्रार अर्ज सादर करून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बँकेचे व्यवस्थापक अनुज कुमार म्हणाले, "पूजाने गेल्या सात महिन्यांपासून हप्ता भरलेला नव्हता, म्हणून तिला बँकेत बोलावण्यात आले होते. तसेच ती स्वतः पतीसह बँकेत आली आणि तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नव्हती. " असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारानंतर पोलिसांनी बँकेच्या कारभारावर लक्ष ठेवून चौकशी सुरू केली. पीडितेच्या तक्रारीनुसार आणि बँक कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादानुसार सखोल तपास केला जात असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामुळे बँकिंग प्रणालीतील पारदर्शकतेवर आणि ग्राहकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.