५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू
दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता
२०२९ लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची चाचणी
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अनेक राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरू होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एकूण ८२४ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुका २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय कसोटी मानली जात आहे.
आजच्या निकालावरून कोणत्या राज्यात कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे निश्चित होईल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्यांमध्ये सकाळी ८ वाजता टपाल मतपत्रिकांनी मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर अर्ध्या तासानंतर ईव्हीएमची मतमोजणी होईल. पुढील २ ते ३ तासांत पहिले कल दिसून येतील. तर या ५ राज्यांमध्ये कुणाचे सरकार येईलयाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकते. सुरक्षेसाठी या सर्व राज्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज या सर्व राज्यांमध्ये दारूबंदीचा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या राज्यांचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाची वेबसाइट आणि व्होटर हेल्पलाइन ॲप वापरू शकता. टीव्ही चॅनेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही तुम्हाला निकालाचे अपडेट पाहायला मिळतील.
देशातील सर्वांचे लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर केंद्रित झाले आहे. या राज्यात एकूण २९४ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. याठिकाणी सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १४८ जागांचा जादुई आकडा पार करणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये २९३ मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून तिथे एकूण ४५९ मतमोजणी केंद्र आहेत. पश्चिम बंगालमध्ये तगडी लढत पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी चौथ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळण्याची आशा आहे.
तामिळनाडूमध्ये २३४ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सध्या द्रमुक पक्ष सत्तेत आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ११८ जागांचा जादुई आकडा गाठावा लागेल. निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यभरात ६२ मतमोजणी केंद्रे आहेत. तामिळनाडूमधील लढत रंजक आहे, कारण टीव्हीके हा एक नवीन पक्षही चर्चेत आहे.
केरळमधील एकूण १४० विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण ८८३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यभरातील ४३ ठिकाणी एकूण १४० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. केरळमध्ये प्रत्येक कार्यकाळात सरकार बदलण्याची प्रवृत्ती आहे. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे व्यक्त केली जात आहे.
आसाम हे ईशान्य भारतातील एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आहे. येथील राजकारणाचा दिल्लीवर परिणाम होतो. आसाम विधानसभेच्या सर्व १२६ जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यातील एकूण ७२२ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. ३५ जिल्ह्यांमधील ४० मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. आसाममध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत असून एक्झिट पोलनुसार त्यांची पकड मजबूत होत असल्याचे दिसत आहे.
पुदुचेरीची विधानसभा लहान असली तरी तिचे राजकीय महत्त्व कमी नाही. येथे एनडीएला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील ३० विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. या राज्यात एकूण सहा मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.