अहमदाबादच्या कांकरिया तलावाजवळ असणार्या प्राणी संग्रहालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात एक तरूण शिरला. २० फूट उंच जाळी ओलांडून तो पिंजऱ्यात गेला. नंतर झाडावर चढला आणि वाघासमोर इशारे करू लागला. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढत पोलिसांच्या तावडीत दिलं. या प्रकरणी तरूणाविरोधात मणिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरूण पिंजऱ्यात शिरल्यानंतर काहींनी त्याचा व्हिडिओ शुट केला. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, तरूण वाघाच्या पिंजऱ्यात जाळीच्या आधारे वर चढला आणि आतमध्ये असलेल्या झाडाच्या आधारे खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो वाघाकडे पाहून काहीतरी इशाराही करत होता. पिंजऱ्याच्या बाहेर असणारी लोक त्याला पिंजऱ्याच्या बाहेर येण्यास सांगत होते. लोकांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तेथे दाखल झाले.
सुरक्षा कर्माचाऱ्यांनी तरूणाला बाहेर येण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर येत असताना तरूणाचा पाय झाडावरून घसरला. पण सुदैवानं तो खाली पडला नाही. नंतर पिंजऱ्याच्या बाहेर आला. तरूण बाहेर आल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्याला पकडलं आणि पोलिसांकडे सोपवलं.
यासंदर्भात मणिनगर पोलिसांनी सांगितलं, अहमदाबादच्या रखियालमध्ये राहणारा अरूण पासवान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो अहमदाबाद येथे नोकरी करत आहे. तो दुपारच्या सुमारास जाळी ओलांडून पिंजऱ्यात शिरला.
या प्रकरणात प्राणी संग्रहालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अरूण विरोधात एफआयआर दाखल केलीय. तसेच मणिनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा कलम ३८ जे आणि बीएनएसची कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, तरूणानं ज्याप्रकारे पिंजऱ्यात प्रवेश केला, यावरून प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.