Will Casinos Allowed in Maharashtra: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिशन आजपासून म्हणजेच सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. या अधिवेशनात युती सरकारकडून अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही विधेयके सुद्धा आणले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच राज्यातील पर्यटनस्थळावर कॅसिनो सुरू करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) युती सरकारकडून एकूण २४ विधेयके आणि ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये राज्यात कॅसिनो सुरू करण्याबाबतचं विधेयक सुद्धा असल्याचं कळतंय. गेल्या काही वर्षांपासून राज्यात कॅसिनो सुरू करण्यात यावेत, यासाठी संबधित व्यावसायिकांकडून मागणी केली जात होती.
आता राज्य सरकार या मागणीवर विचार करणार असून कॅसिनोसंदर्भातील परवाने, अटीशर्ती असलेले विधेयक आणून कॅसिनोला परवानगी मिळण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली असल्याचे समजते. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरू करण्याची मागणी केली होती.
अमेरिका, मलेशिया, थायलंड, मकाऊ यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या देशांमध्येच नव्हे, तर आपले शेजारी राज्य असलेल्या गोवा, सिक्किम, मकाऊ, नेपाळमध्ये कॅसिनो गेमिंगला परवानगी असल्यामुळे तिथे मोठया प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाल्याचे मनसेने पत्रात म्हटले होते.
देशात ऑनलाइन गेमिंगच्या पार्श्वभूमिवर कॅसिनोला परवानगी द्यायला हवी. कायदा नसल्याने राज्याचा जवळपास ३ ते ३.५० हजार कोटींचा व्यवसाय बुडत असल्याचे मनसेकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक येते का? आणि त्यास मंजुरी मिळते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा १९७६ पासून आहे, पण त्याची अधिसूचना काढलेली नसल्याने त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या कायद्यात कॅसिनोसाठीची परवाना प्रक्रिया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १८८७ पासून लागू असलेला मुंबई जुगार प्रतिबंधक कायदाही कॅसिनोला लागू होणार नसल्याचे या कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.